माधुरी’च्या निमित्ताने ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकरचे पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल
मराठी सिनेमा आता सातासमुद्रापार पोहोचला आहे, बॉलिवूडसह इतर प्रादेशिक चित्रपटसृष्टीतून देखील मराठी चित्रपटांचे कौतुक होत आहे. या कौतुकाचे श्रेय मराठी मातीतील कथा, कलाकारांचे अभिनय कौशल्य, मनोरंजनसृष्टीशी संबंधित असलेल्या प्रत्येकाची मेहनत, दिग्दर्शक आणि मराठी चित्रपटांत विश्वास ठेवून त्याची निर्मिती करणारे निर्माते यांना दिले जाते. अशाप्रकारे, मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने सोशल मिडीयाच्या माध्यमातून नुकतीच तिच्या ‘माधुरी’ या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. मराठी चित्रपटाप्रती असलेले प्रेम आणि विश्वास दाखवून उर्मिला मातोंडकरचे पती आणि ‘मुंबापुरी प्रॉडक्शन’चे मोहसिन अख्तर मीर यांनी ‘माधुरी’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
काश्मिरी बिझनेसमन आणि मॉडेल असणारे मोहसिन अख्तर मीर यांच्यासाठी मराठमोळ्या पत्नीचा मराठी चित्रपट निर्मित करणे ही त्यांच्यासाठी नक्कीच खास बाब असेल. मराठी चित्रपटसृष्टीचे होणारे कौतुक पाहता, मोहसिन यांना मराठी चित्रपटाविषयीचे कुतूहल निर्माण झाले. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत निर्मितीविषयी काहीही अनुभव नसताना देखील मराठी मातीतील कथा, मराठी कलाकारांचे अभिनय कौशल्य आदी गोष्टींमुळे ‘माधुरी’ या चित्रपटाची निर्मिती करण्याचा त्यांनी निर्णय पक्का केला. मोहसिन अख्तर मीर यांना जशी मराठी चित्रपटाप्रती आवड आहे, त्याचप्रमाणे मुंबईविषयी देखील त्यांना आपुलकी आणि जिव्हाळा आहे हे त्यांच्या ‘मुंबापुरी प्रॉडक्शन हाऊस’ या नावावरुन लगेच कळून येते. कोणत्याही कामाला जेव्हा एक कलाकृती म्हणून सादर करायचे असते तेव्हा ‘स्पेशल कनेक्शन’ गरजेचे असते आणि मोहसिन अख्तर मीर आणि मराठी चित्रपट-मुंबईमध्ये एक‘स्पेशल कनेक्शन’ आहे त्यामुळे प्रेक्षकांना ‘माधुरी’च्या रुपातून एक सुंदर कलाकृती पाहायला मिळणार हे नक्की.
एका सुंदर नात्यावर गुंफलेला दर्जेदार, खुसखुशीत आणि सुंदर असा ‘माधुरी’ चित्रपट प्रेक्षकांसाठी एक निखळ आणि अर्थपूर्ण मनोरंजनाची मेजवाणी असेल. उत्सुकता वाढलेल्या या चित्रपटात उर्मिला मातोंडकरने कोणती भूमिका साकारली आहे आणि एकूण या चित्रपटाची कथा काय आहे याविषयीची माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे.