Marathi News

मराठी चित्रपट ‘जजमेंट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

judgment

ज्योत्स्ना फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित ‘जजमेंट’ या मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. या वेळी चित्रपट कसा घडला, पडद्यामागील किस्से, गमतीजमती यांचा व्हिडीओसुद्धा लाँच करण्यात आला. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या चित्रपटात तेजश्री प्रधान, मंगेश देसाई , माधव अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  हा चित्रपट निवृत्त सनदी अधिकारी आणि पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या “ऋण” कादंबरीवर आधारित आहे. दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांनी या पूर्वी व. पु. काळे यांच्या ‘पार्टनर’ या कादंबरीवर आधारित ‘श्री पार्टनर’ आणि ‘शुभ लग्न सावधान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
त्यामुळे ‘जजमेंट’ चित्रपटातही निश्चितच वेगळेपण असेल. डॉ. प्रल्हाद खंदारे आणि हर्षमोहन कृष्णात्रेय यांनी  या  चित्रपटाच्या निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. या पूर्वी हर्षमोहन कृष्णात्रेय यांनी अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पकडापकडी’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. ‘जजमेंट’ चित्रपटाच्या गाण्याचे गीतकार मंदार चोळकर असून संगीतकार नवल शास्त्री आहेत. या चित्रपटात ‘श्री पार्टनर’ फेम श्वेता पगार , हिचीसुद्धा महत्वाची भूमिका आहे. सोबत सतीश सलागरे,  किशोरी अंबिये ,महेंद्र तेरेदेसाई, शलाका आपटे, विजय भानू, शिल्पा गांधी, प्रतीक देशमुख, निलेश देशपांडे, बाल कलाकार चैत्रा देशमुख आणि नुमायारा खान आदी कलाकार सुद्धा आहेत.
या वेळी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर, जे व्ही पवार (दलित पॅंथर संस्थापक सदस्य, दलित साहित्यिक), अर्जुन डांगळे (दलित पॅंथर सदस्य, दलित साहित्यिक), ॲड. जयदेव गायकवाड (माजी आमदार, दलित पॅंथर सदस्य) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘पँथर’ या आगामी हिंदी चित्रपटाची घोषणाही करण्यात आली, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन हर्षमोहन कृष्णात्रेय यांचे असेल.

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button