Marathi News
भीमा पडली प्रेमात
‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ ही पाडगावकरांची प्रचलित कविता प्रत्येक वयोगटातील लोकांना साजेशी आहे. प्रेमाला वय नसते, ते कधीही होते. असेच काहीसे ‘गं सहाजणी’ मधील ‘भीमा’ सोबत झाले आहे. मंजुळाबाई उसने परतफेड बँकेत कॅश डिपार्टमेंट सांभाळणारी भीमा प्रेमात पडली आहे !
‘गं सहाजणी’ मध्ये सर्वात वजनदार व्यक्तिमत्व असणा-या या भीमाला आतापर्यंत लग्नासाठी तिला हवा तसा वर मिळत नव्हता, मात्र प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर तिला तिचा जीवनसखा मिळाला आहे. आपल्या भावी आयुष्यासाठी तिने एका रिक्षावाल्याच्या गळ्यात वरमाळा घालण्याचे ठरवले आहे. त्याच्या रिक्षात बसून वैवाहिक जीवनाची सफर करण्याचे गोडगुलाबी स्वप्न भीमाला पडत आहे. भीमाचे हे स्वप्न वास्तव्यात येईल का? तिच्या स्वप्नातला रिक्षावाला खऱ्या आयुष्यात कसा असेल? हे सारे काही ‘गं सहाजणी’च्या दि. २६ ते २९ डिसेंबरच्या भागात पाहायला मिळेल. तसेच भीमाच्या या गुलाबी प्रवासात तिच्या पाच मैत्रिणी तिला कशी मदत करतात हे पाहणे देखील गमतीशीर ठरणार आहे. प्रेमात पडलेल्या भीमाचा हा रोमेंटिक अंदाज आपल्याला लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळेल. विशेष म्हणजे भीमाच्या भूमिकेत असणाऱ्या पोर्णिमा अहिरे या अभिनेत्रीच्या अभिनयाचा हा वेगळा पैलू देखील पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे.