श्रावण महिन्याच्या पाठोपाठ येत असलेल्या सणासुदीचे वेध सर्वत्र लागू झाले आहेत. गोपाळकाला, गणपती अश्या एका मागून एक येत असलेल्या विविध सणवारांदरम्यानचा लोकांमधला उत्साह काही औरच असतो. त्यामुळे, याच उत्सवांच्या निमित्ताने, सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या ‘बॉलीवूड थीमपार्क’ मध्ये नुकताच दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करण्यात आला. कर्जत येथील नितीन चंद्रकांत देसाई यांच्या एन.डी.स्टुडीयोत साकारण्यात आलेल्या या बॉलीवूड मायानगरीत, उभारण्यात आलेल्या छोटेखानी हंडीचा स्थानिक गोविंदांनी मनसोक्त आनंद लुटला.
इतकेच नव्हे तर, लवकरच येत असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने, एन.डी.स्टुडियोच्या आवारातील गणेशमूर्तीची पारंपारिक पूजा आणि महा आरती करण्यात आली. बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेत पार पडलेल्या विघ्नहर्त्याच्या या महाआरतीत एन.डी.स्टुडीयोतील सर्व कलाकारांनी उपस्थिती लावली होती. एरव्ही, बॉलीवूडच्या बहुरंगी जल्लोषाने नटलेले हे थीमपार्क अथर्वशिर्षने अध्यात्मिक रंगात न्हाऊन गेले होते.