बिग बॉस मराठीच्या घरात ‘आया शेर आया शेर’. आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो आरोह वेलणकर
ह्या विकेन्डला बिग बॉस मराठीच्या घरात नवीन वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. ‘रेगे’ फेम अभिनेता आरोह वेलणकरने बिग बॉसच्या घरात हिरो स्टाइल डॅशिंग एन्ट्री घेतली आहे. आता वाघाची एन्ट्री झाल्यावर हा खेळ अजून रंगतदार होणार आहे.
प्रविण तरडे लिखीत आणि अभिजीत पानसे दिग्दर्शित रेगे सिनेमातून आरोहचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण झाले. त्यानंतर तो घंटा ह्या सिनेमातही दिसला होता. आरोह सध्या रंगभूमीवर ‘व्हाय सो गंभीर’ ह्या नाटकातल्या मुख्य भूमिकेत प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. आणि आता बिग बॉस मराठी ह्या रिएलिटी शोव्दारे आरोहचे टेलिव्हिजनवर पदार्पण झाले आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात जाताना आरोह वेलणकर म्हणाला, “मला बिग बॉस हा शो खूप आवडतो. त्यामुळे जेव्हा बिग बॉसच्या घरात जाण्याची संधी आली तेव्हा मी लगेच ती स्विकारली. आम्ही कलाकार म्हणून जेव्हा काम करतो. तेव्हा माणुस म्हणून कसे आहोत, हे चाहत्यांना माहित नसते. बिग बॉस हा एकुलता एक शो आहे, ज्यामूळे माणुस म्हणून आम्ही कसे आहोत, हे 24 तास कॅमे-यासमोर राहून प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकते. कारण इथे जसं दिसतं तसंच असतं.”
आरोह वेलणकरच्या धमाकेदार एन्ट्रीने बिग बॉसने घरच्यांना सरप्राइज दिले. आरोहच्या येण्याने बिग बॉस मराठीमध्ये नवचैतन्य दिसून येत आहे. नेहा शितोळे, माधव देवचके आणि शिवानी सुर्वे ह्या आरोहच्या मित्रांनी तर आरोहचे आनंदाने स्वागत केलेच आहे. पण आरोहला पहिल्यांदाच भेटलेल्या वैशाली म्हाडे आणि अभिजीत केळकर ह्यांच्या बोलण्यावरूनही त्यांना आरोह आवडला असल्याचेच दिसून आले.
आरोहच्या एन्ट्रीनंतर अभिजीत आणि वैशाली एकमेकांशी बोलताना म्हणाले, “आरोह खूप क्युट आणि देखणा असण्यासोबतच सकारात्मक वाटत आहे. तो त्याच्या विचारांमध्ये खूप स्पष्ट असल्याचे दिसून येतेय. नको त्या गोष्टींमध्ये अडकणार नाही, असंच वाटतंय. त्याच्याकडून निगेटिव्ह व्हाइब्स येत नाहीत. त्याच्याशी चांगलं जमेल असंच वाटतंय. मला तो खूप आवडला.”