Marathi News
बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिले ‘बॉईज’ ला शुभार्शिवाद
किशोरवयीन मुलांच्या भावविश्वावर भाष्य करणा-या ‘बॉईज’ या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. घरापासून दूर बोर्डिंगमध्ये राहत असलेल्या तीन मित्रांची हि दुनिया, प्रेक्षकांना आवडत असून, चक्क बिग बी अमिताभ बच्चन यांनी या सिनेमाला विशेष दाद दिली. ८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या कलाकारांनी बिग बी यांची भेट घेतली होती, त्यादरम्यान त्यांनी सिनेमाच्या ट्रेलरचे कौतुक करत, ‘बॉईज’ सिनेमा आवर्जून पाहणार असल्याचे सांगितले. एव्हढेच नव्हे तर, पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड या सिनेमातील मुख्य कलाकारांसोबत सेल्फी काढत त्यांनी संपूर्ण टीमला चीअरअप केले. अभिनयाचा बादशहा असलेल्या अमिताभजींच्या शुभार्शिवादामुळे ह्या सिनेमाचा दर्जा आणखीनच वाढला आहे.
सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले असून, अवधूत गुप्ते प्रथमच प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेतून लोकांसमोर आले आहेत.