बाप्पांना भेटण्याची आणखी एक संधी – अभिनेता संजय खापरे
वर्षातून एकदा येणाऱ्या गणेशोत्त्सवाची रंगत वेगळीच आहे. मात्र या गणेश जयंतीच्या निमित्ताने तोच उत्साह जल्लोष पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी मिळते. यंदाच्या गणेश जयंतीची आठवण होणायामागचं विशेष कारण म्हणजे नुकताच येणारा माझा ‘मेमरी कार्ड’ हा सिनेमा. या सिनेमातीची नेमकी कथा सुरु होताना पहिलाच शॉट मी बाप्पांची आरती करताना आहे. निर्सगरम्य वातारणात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा होणार कोकणातील गणपती या सिनेमाच्या निम्मिताने आम्ही साजरा केला. मुंबईच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच शिवडीत माझं बालपण गेलं. सणावारांच ते भन्नाट वातारण स्वतः पाहिल्यामुळे मनावर अगदी पक्कं कोरलं गेलं आहे.
माझे बाबा आणि काका उत्तम आर्टिस्ट असल्यामुळे गणपतीची सजावट, मखर यासारख्या गोष्टी ते स्वतःहून बनवायचे. त्यांचे हे गुण मी आणि माझ्या भावात ओघाने आलेच. कॉलेजच्या दिवसात आम्ही देखील हा कित्ता पुढे काही काळ गिरवला. आईच्या हातचे मालपोआ आणि बाबांसोबत घालवलेल्या त्या दिवसांचा आनंद काही औरच होता. चिपळूणला आमच्या मूळगावी नाटक सिनेमाच्या दौऱ्यानिमित्त गणेशोत्त्सव नेहमी गाठायचो. मात्र एकदा गोपाळ रे गोपाळा नाटकाच्या निमित्ताने गोव्याला गेलो असता त्या वर्षीचा गणेशोत्त्सव चुकतो की अशी भीती होती मात्र मानगावच्या जवळ आलं असता तिथून जाताना गणपतीची मिरवणूक दिसली आणि आम्ही सगळयांनी एकमताने निर्णय घेत त्या गणपती विर्सजनाच्या मिरवणुकीत सहभागी झालो आणि त्याही परिस्थितीत गणेशोत्सव साजरा केला. अशा अनेक आठवणींनी भरलेलं ‘मेमरी कार्ड’ नेहमीच जपून ठेवलं पाहिजे.