Marathi News
‘बबन’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘ख्वाडा’ चे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे लिखित आणि दिग्दर्शित ‘बबन’ या आगामी सिनेमाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. येत्या २३ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील गाण्यांनी यापूर्वीच सिनेरसिकांना मोहिनी घातली असून, सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या ट्रेललादेखील सिनेरसिकांचा कमालीचा प्रतिसाद लाभत आहे. आजच्या तरुण पिढीचे भावविश्व मांडणाऱ्या या सिनेमाचे द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट हे प्रस्तुतकर्ते असून चित्राक्ष फिल्म्सने याची निर्मिती केली आहे.
‘ख्वाडा’ सिनेमातून नावारूपास आलेला गुणी अभिनेता भाऊसाहेब शिंदेची यात प्रमुख भूमिका असून, त्याच्यासोबतीला गायत्री जाधव हि नवोदित अभिनेत्री झळकणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये भाऊसाहेब गावरान युवकाच्या भूमिकेत जरी असला, तरी ‘ख्वाडा’च्या व्याक्तीरेखेहून अगदी वेगळी भूमिका त्याने साकारली असल्याचे आपणास पाहायला मिळते. या ट्रेलरमध्ये प्रेम आणि संघर्ष अश्या दोन्ही बाजू दिसून येतात. ग्रामीण जीवनातील संघर्ष आणि कुरघोड्यादेखील या ट्रेलरमध्ये आपणास पाहायला मिळत असल्यामुळे, हा सिनेमा प्रेमाच्या गुलाबी थंडीबरोबरच वास्तविक जीवनातील दाह लोकांसमोर घेऊन येत असल्याचे या ट्रेलरमध्ये दिसून येते. मनोरंजनाची पुरेपूर मेजवानी असलेल्या या सिनेमाच्या निर्मितीची धुरा विठ्ठलराव कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, मोनाली संदीप फंड आणि भाऊसाहेब शिंदे या चौकडीने सांभाळली आहे.