बकेट लिस्ट चित्रपटाचा टीझर प्रदर्शित – गृहिणींचं महत्त्व पटवून देण्यास माधुरी सज्ज
बॉलिवूडची मराठमोळी अप्सरा माधुरी दीक्षित मराठीत अवतरणार हे ऐकल्यापासून तिचा पहिला – वहिला मराठी चित्रपट ‘बकेट लिस्ट’ ची झलक पाहण्यासाठी सगळेच आसुसले होते. माधुरीच्या चाहत्यांच्या मनातली ही इच्छा नुकताच लाँच झालेल्या टीझरने पूर्ण झाली आहे. ‘बकेट लिस्ट’ या सिनेमाच्या टीझरमधून माधुरीच्या रूपातील मधुरा साने आपल्यासमोर आली आहे.
मिसेस साने, राधिका-नीलची आई, सान्यांची सून अशा विविध भूमिका साकारणाऱ्या मधुराचं सईच्या येण्यानं बदलेलं आयुष्य बकेट लिस्ट या चित्रपटातून उलगडत जाणार आहे. स्वत:ला विसरून बसलेल्या गृहिणीचा हा प्रवास… या प्रवासात पदोपदी तिला भेटत जाणारी माणसं आणि त्यामुळे बदलत जाणाऱ्या तिच्या आयुष्याचं चित्रण या चित्रपटाच्यानिमित्ताने आपण पाहू शकणार आहोत. स्वत्व विसरत चाललेल्या गृहिणींना नव्याने आपली ओळख करून देणारा बकेट लिस्ट सिनेमा हसता-हसता प्रेक्षकांना एक मोलाचा संदेश देऊन जाईल असा विश्वास माधुरीने व्यक्त केला आहे.
डार्क हॉर्स सिनेमा, दार मोशन पिक्चर्स आणि ब्लू मस्टँग क्रिएशन्स निर्मित ‘बकेट लिस्ट’ या सिनेमातून एक गृहिणी साकारत असलेल्या आई, मैत्रीण, बहिण, मुलगी अशा विविध भूमिकांमध्ये माधुरी आपल्याला दिसणार आहे. या सगळ्याच भूमिका उत्कृष्टरित्या साकारताना आपल्या वेगळेपणातून प्रेक्षकांची करमणूक करण्यात माधुरी साकारत असलेली सानेंची सून यशस्वी होईल असा विश्वास या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी दर्शवला आहे.
दुय्यम समजल्या जाणाऱ्या गृहिणीला मध्यवर्ती ठेऊन या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर आणि देवश्री शिवाडेकर यांनी तिच्या अवती-भवती चित्रपटाची कथा गुंफली आहे.
या चित्रपटात माधुरी दीक्षितबरोबर सुमित राघवन, वंदना गुप्ते, प्रदीप वेलणकर, रेणुका शहाणे, शुभा खोटे अशी तगडी कलाकार मंडळी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
बकेट लिस्ट चित्रपटाच्यानिमित्ताने लवकरच माधुरीच्या मराठमोळ्या रूपाची जादू प्रेक्षकांवर होणार आहे.