Marathi News
‘पिप्सी’ प्रेक्षकांच्या भेटीला
वजनदार,राज्य पुरस्कार प्राप्त रेडू, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त रिंगण,गच्ची असे एकसे बढकर एक विषय असलेले चित्रपट मराठी सिनेसृष्टीला देणाऱ्या लॅन्डमार्क फिल्म्सचा ‘पिप्सी’ हा सिनेमा २७ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकताच पोस्टर लाँँच करण्यात आला. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित या सिनेमाच्या पोस्टरवर एक लहान मुलगा आणि मुलगी आपल्याला दिसून येतात. ग्रामीण भागातील या दोन लहानग्यांच्या मैत्रीवर हा सिनेमा बेतला असल्याचा अंदाज ‘पिप्सी’चा पोस्टर पाहताना येतो. यावर्षीच्या राज्य पुरस्कार सोहळ्यांमध्ये विशेष मोहोर उमटवणारा हा सिनेमा येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
या सिनेमात मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी हे दोन बालकलाकार प्रमुख भूमिकेत असून, यापूर्वी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या टीझरमध्ये देखील ते आपणास दिसून आले आहेत. विशेष म्हणजे, यंदाच्या ५५ व्या राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये मैथिली पटवर्धनला सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सौरभ भावे लिखित आणि रोहन देशपांडे दिग्दर्शित या सिनेमात लहान मुलांची निरागसता टिपण्यात आली असून, वास्तविक आयुष्यात घडत असलेल्या घडामोडींमधून त्यांनी काढलेला निष्कर्ष आपल्याला पाहता येणार आहे.
दर्जेदार कथानक आणि मांडणी असलेला हा सिनेमा राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली विशेष छाप पाडत आहे. २०१८ सालच्या एन .आय.टी.टी.ई या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आणि यंदाच्या ५८ व्या झ्लीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या सिनेमाची निवड झाली होती. तसेच आगामी बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठीदेखील ‘पिप्सी’ चित्रपटाचा समावेश झाला आहे. इतकेच नव्हे तर, गतवर्षीच्या मामी महोत्सवात आणि स्माईल आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या बाल आणि तरुण वर्गासाठी देण्यात येणाऱ्या स्पर्धेच्या यादीतही ‘पिप्सी’ चित्रपटाने स्थान मिळवले आहे. अशाप्रकारे एक हटके विषय घेऊन सर्वत्र आपली मोहर उमटवणारा हा सिनेमा महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनादेखील ‘पिप्सी..अ बॉटल फूल ऑफ होप’ असं म्हणत आपलंसं करण्यास लवकरच येत आहे.