“पाखराला घ्यायची असते उंच आकाशात भरारी मनात आस ठेऊन भारी कधीतरी पूर्ण होईल त्यांची प्रेमवारी….”

“प्रेमवारी” या चित्रपटाचा अतिशय सुंदर ट्रेलर चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच रिलीज करण्यात आला. प्रेम या छोट्याशा शब्दाची न सांगता येणारी अशी व्यापक व्याख्या आहे. आणि ‘प्रेम’ ह्या शब्दाला कोणत्याच चौकटीत पूर्णपणे बसवता येत नाही. याच प्रेमाला असंख्य अशी रूपे आहे त्यातील एका रूपाचे दर्शन आपल्याला या चित्रपटातून घडणार आहे. राहुल आणि पूजा यांची कॉलेज मध्ये होणारी भेट, त्यातून फुलत जाणारं प्रेम पण, याच प्रेमात काही गोष्टी अडसर ठरायला लागतात आणि काही कारणामुळे परिवाराकडून होणारा विरोध या सर्व अडथळ्यामुळे  पुढे ह्या प्रेमाचा प्रवास कसा होतो ते आपल्याला चित्रपटातच पाहावे लागेल. यापूर्वी देखील कॉलेज जीवन आणि त्यात  होणारे प्रेम  यावर आधारित अनेक चित्रपट येऊन गेले आहे. पण हा चित्रपट इतर चित्रपटापेक्षा नक्कीच वेगळा ठरणार आहे.
आता यात वेगळेपणा नक्की  काय असणार आहे, यासाठी हा सिनेमा पाहावा लागेल. या सिनेमात  चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चिन्मय बऱ्याच दिवसांनी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर मयुरी कापडणे च्या रूपाने मराठी चित्रपट सृष्टीला एक नवीन चेहरा मिळणार आहे. यांच्यासोबतच भारत गणेशपुरे, अभिजित चव्हाण, नम्रता पावसकर, राजेश नन्नावरे, निशा माने, प्रियांका उबाळे, विशाल खिरे हे कलाकार देखील चित्रपटामध्ये दिसणार आहे.
‘प्रेमवारी’ हा सिनेमा व्हॅलेंटाइन डे च्या आठवड्यात म्हणजेच ८ फेब्रुवारी ला हा  सिनेमा रिलीज होणार आहे. रोमँटिक सिनेमा आणि व्हॅलेंटाइन डे चा आठवडा हा एक चांगला योगायोग जुळून आला आहे. या सिनेमाला मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक अमितराज याने संगीत दिले असून वैशाली सामंत, श्रेया घोषाल, आदर्श शिंदे आणि सोनू निगम यांनी आपल्या मधुर आवाजाने गाण्यांना स्वरसाज चढवला आहे.  साईममित प्रोडक्शन निर्मित ‘प्रेमवारी’ या आगामी सिनेमाद्वारे प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर येणार आहे.या सुंदर चित्रपटाचे  लेखन,निर्मिती आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून, प्रस्तुतकर्त्याची धुरादेखील त्यांनीच सांभाळली आहे.