Marathi News

“डॉ. रखमाबाई” चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच रखमा ते डॉ. रखमाबाई उलगडणार प्रवास

dr-rakhmabai-1st-look-launched

भारताला वैद्यकीय सेवा देणारी पहिली स्त्री वैद्य कोण?… हा प्रश्न एखाद्याला विचारला की फार क्वचित अचूक उत्तराची अपेक्षा असते. वैद्यकीय क्षेत्रात आज कित्येक महिला काम करताना दिसतात. मात्र या सगळ्यांत वैद्यकीय सेवा देणारी “ती” पहिली भारतीय स्त्री वैद्य कोण…? याबाबत मात्र आजही लोक साशंक आहेत. हीच शंका दूर करण्याच्या उद्देशाने डॉ. स्वप्ना पाटकर यांची चित्रसंस्था रॉयल मराठा एन्टरटेनमेंट वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणारी पहिली स्त्री वैद्य “डॉ. रखमाबाई” यांचा जीवनप्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मांडणार आहेत.

नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच करण्यात आला. यात अठराशेच्या दशकात वैद्यकीय सेवांमध्ये स्वत:ला वाहून घेतलेल्या डॉ. रखमाबाईंच्या आयुष्याचं “RULES DON’T APPLY” हे ब्रीद या पोस्टरवर आपल्याला दिसतं. डॉ. रखमाबाईंचा लढा आपल्यासमोर मांडणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी केले आहे. बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी डॉ. रखमाबाई या चित्रपटाच्यानिमित्ताने मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटाची निर्मिती डॉ. स्वप्ना पाटकर यांनी केली आहे.

निर्मितीसाठी डॉ. रखमाबाई हा विषय का निवडला असा प्रश्न निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर यांना विचारला असता… एका आदर्श स्त्रीचा प्रवास समाजासमोर आणण्याच्या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती केल्याचे त्या म्हणाल्या. अठराव्या दशकात स्त्रियांना भोगाव्या लागणाऱ्या यातना आजही तशाच आहेत. कपडे बदलले असले तरी मानसिकता तीच आहे. शिक्षणाने माणूस मोठा होतो…त्याचे विचार बदलतात असे आपण कितीही म्हटले, तरी हा केवळ भ्रम असून परिस्थिती ही मनोवृत्तीवर अवलंबून असते. जोपर्यंत या समाजाची स्त्रीकडे पाहण्याची वृत्ती बदलत नाही तोपर्यंत स्त्रीच्या परिस्थितीत बदल शक्य नसल्याचे, डॉ. स्वप्ना म्हणतात. मुद्दा, बालविवाहाचा असू देत किंवा स्त्री अत्याचाराचा…हे सगळेच प्रश्न आजही तितकेच ताजे आहेत. आणि याच सगळ्या विषयांवर प्रकाशझोत टाकण्याचे काम हा चित्रपट करेल.

परिस्थिती बदलायची असेल तर मनोवृत्ती बदलणे गरजेचे असून हा चित्रपट त्यात हातभार लावेल, असा विश्वास डॉ. स्वप्ना यांनी दर्शवला आहे. स्त्री जीवनाचा खडतर प्रवास असणारा हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button