चित्रीकरणावेळी 8 ते 9 ग्लास उसाचा रस पिऊन अभिनेता प्रथमेश परब पडला आजारी
अभिनेता प्रथमेश परब आपल्या प्रत्येक भूमिका खूप समरसून वठवतो. त्यामूळेच ‘बालक पालक’चा विशु , किंवा ‘टाइमपास’चा दगडु सारख्या भूमिका त्याच्या चाहत्यांच्या आजही लक्षात राहिल्यात. प्रथमेश परब आता आपली नवी फिल्म ‘टकाटक’ घेऊन आलाय. ‘टकाटक’च्या चित्रीकरणावेळीही आपल्या गण्या ह्या भूमिकेसोबत प्रथमेश खूप समरसून गेला होता. पण एका सीनवेळी भूमिकेसोबत समरसून जाणे त्याला चांगलेच महागात पडले.
सूत्रांच्या अनुसार, ‘टकाटक’च्या चित्रीकरणावेळी एका सीनमध्ये प्रथमेशला उसाचा रस प्यायचा होता. प्रथमेशने चित्रीकरणावेळी एका घोटात रस प्यायला खरा. पण नंतर काही कारणामूळे रिटेक वर रिटेक होऊ लागले. त्यावेळी सीन चांगला व्हावा म्हणून प्रथमेश दरवेळी एका घोटात पूर्ण उसाच्या रसाचा ग्लास संपवत होता. असं करता-करता प्रथमेशने लागोपाठ 8 ते 9 ग्लास उसाचा रस प्यायला. ज्यामूळे थोड्यावेळातच त्याला उलट्या सुरू झाल्या. आणि तो आजारी पडला.
ह्या बातमीला दूजोरा देताना प्रथमेश म्हणाला, “हो, आम्ही खूप उन्हाळ्यात चित्रीकरण करत होतो. दूपारचे जेवण झाल्यावर आम्ही त्या सीनच्या चित्रीकरणाला सुरूवात केली. अगोदरच माझे पोट भरले होते. त्यात लागोपाठ 8 ते 10 ग्लास रस पोटात गेल्यावर मग मात्र मला मळमळायला सुरूवात झाली. चित्रीकरण सुरू होते. म्हणून सुरूवातीला मी काही बोललो नाही. पण नंतर मात्र माझ्या उलट्या सुरू झाल्या आणि मी आजारी पडलो.”
प्रथमेश परब पूढे सांगतो, “जेव्हा त्या सीनविषयी चर्चा झाली. तेव्हा मला तो सीन करताना एका घोटात उसाचा रस संपवायचाय, असे मी इम्प्रोवायझेशन करायचे ठरवले होते. जेव्हा मला ही कल्पना सुचली तेव्हा हे लक्षात आले नाही, की समजा रिटेक झाले तर ह्याचे काही साइड इफेक्ट्स होऊ शकतात. मी सीनमध्ये एवढा इन्व्हॉल्व्ह झालो की, किती रिटेक होत होते, आणि मी किती ग्लास पित होतो, ह्याकडे लक्षच नव्हते. आता तो सीन बघताना खूप छान वाटतं. पण तेव्हा मात्र परफेक्शनच्या नादात चांगलाच आजारी पडलो होतो.”