Marathi News
गुलशन देवय्या मांडणार मराठीत ‘डाव’
मराठी चित्रपटाचा विषय आणि प्रसिद्धी लक्षात घेता, बॉलीवूडकरांच्या नजरा मराठी सिनेसृष्टीकडे वळलेल्या दिसून येत आहे. दिवसेंदिवस मराठी चित्रपटांची प्रगती वाढत असल्याकारणामुळे अनेक हिंदी कलाकारांनी या मायमराठीत नशीब आजमावले आहे. विशेष म्हणजे, रसिकांनी देखील त्याला लगेच आपलेसे केले असल्यामुळे, बॉलीवूडकरांचा मराठी चित्रपटातील कल वाढला आहे.
हिंदीत विशेष नाव आणि प्रसिद्धी मिळून देखील, मराठीत पदार्पण करणाऱ्या हिंदी कलाकरांच्या यादीत गुलशन देवय्या या अभिनेत्याचे नाव नव्याने दाखल होत आहे. राम लीला, शैतान, तसेच हंटर या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा हा अभिनेता लवकरच ‘डाव’ या मराठी चित्रपटातून झळकणार आहे.
मूळच्या बंगळुरूचा असणाऱ्या गुलशनने या सिनेमासाठी महिनाभर मराठीचे धडे गिरवून घेतले असल्याचे समजते. याद्दल सांगताना गुलशनने सांगितले की, ‘यापूर्वी हंटर या सिनेमात मी मराठीमध्ये काही एक-दोन वाक्य बोललो असेल, पण त्यामुळे मला मराठी बोलता येते असे नव्हते. मात्र, आगामी ‘डाव’ या मराठी सिनेमासाठी मला अस्सलखीत मराठी बोलणे गरजेचे होते, शिवाय या सिनेमाची कथा मला खूप आवडली होती, त्यामुळे भाषेच्या समस्येमुळे चित्रपट नाकारण्याची रिस्क मी घेतली नाही, त्यापेक्षा महिनाभर मराठीचे प्रशिक्षण घेणे मला योग्य वाटले. अर्थात मुंबईतील मराठी वातावरणात मी राहिलो असल्यामुळे, हि भाषा अवगत होण्यास जास्त वेळ लागला नाही. आता मी चांगल्याप्रकारे मराठी बोलू शकतो’ .
आतापर्यंत बॉलीवूडच्या अनेक दर्जेदार सिनेमाची निर्मिती करणाऱ्या ऑडबॉल मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘डाव’ हा पहिलाच मराठी सिनेमा असून कनिश्क वर्मा यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. शिवाय हिंदी आणि मराठी अशा द्विभाषेमध्ये हा सिनेमा चित्रित झाला असल्यामुळे, तो कुतूहलाचा विषय ठरत आहे. टॉनी डिसुजा, नितीन उपाध्याय आणि अमूल मोहन या सिनेमाचे निर्माते आहेत. हिंदीत विशेष कामगिरी बजावणारा गुलशन मराठीत काय ‘डाव’ मांडतोय हे लवकरच कळेल.