‘गच्ची’ वर झाला होता गंभीर अपघात : अभय महाजनला करावी लागली प्लास्टिक सर्जरी

अभय महाजनला करावी लागली प्लास्टिक सर्जरी

शुटींगदरम्यान अमूक कलाकाराला झाली इजा, अश्या शीर्षकाच्या अनेक बातम्या आपण ऐकतो. आपल्या कामात चोखपणा आणण्यासाठी भूमिकेत प्राण ओतणा-या प्रत्येक कलाकाराला अश्या घटनांना सामोरे जावे लागते. अशीच एक घटना लँडमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि नितीन वैद्य प्राॅडक्शन्स निर्मित ‘गच्ची’ या सिनेमातील अभिनेता अभय महाजनसोबत घडली. नचिकेत सामंत यांच्या दिग्दर्शनाखाली गच्चीवर झालेल्या या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान अभय आपल्या भूमिकेत इतका गुंग झाला होता कि, तो गच्चीवरील एका कठड्यावर जोरात आदळला. आपली सहकारी कलाकार प्रिया बापटसोबतचा एक सीन शूट करीत असताना, अभयचा बेलेंस बिघडला, आणि थेट एका कठड्यावर त्याचा कपाळमोक्ष झाला.

स्वतःला अभिनयात पूर्णपणे झोकून दिल्यामुळे बेसावध असलेल्या अभयला स्वतःचा तोल सांभाळता आला नाही. कठडा जोरात लागल्यामुळे त्याच्या कपाळावर भलीमोठी खोचदेखील पडली होती. जखम अधिक खोल असल्याकारणामुळे त्यावर टाके मारावे लागले होते. मात्र, शुटींगचा तिसराच दिवस असल्याकारणामुळे, संपूर्ण सिनेमा चित्रित होणे बाकी होता. त्यामुळे अभयच्या डोक्यावर पडलेले टाके संपूर्ण चित्रपटात दिसणार होते. असे होऊ नये, म्हणून अभयच्या कपाळावर प्लास्टिक सर्जरीदेखील करण्यात आली. सिनेमाच्या चित्रीकरणारंभालाच झालेल्या या अपघातामुळे, संपूर्ण युनिटदेखील हादरून गेले होते. मात्र ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत अभयने सर्वांना धीर देत नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. येत्या २२ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत असलेली ‘गच्ची’ वरील ही गोष्ट, सिनेरसिकांना मनोरंजांची मोठी मेजवानी देऊन जाणार आहे.
Exit mobile version