मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांकडून कर्जत येथील नितीन चंद्रकांत देसाई यांच्या एन.डी. स्टुडिओत दि.२८ एप्रिल ते १ मे दरम्यान ‘बॉलिवूड पर्यटन’ चा महामेळा भरवण्यात आला आहे. यादरम्यान ३० एप्रिल रोजी भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रणेते दादासाहेब फाळके जयंती आणि १ मे महाराष्ट्र दिन अश्या दुहेरी मुहूर्ताचे औचित्यदेखील या चारदिवसीय कार्यक्रमात साधण्यात आले आहे.
नितीन चंद्क्रांत देसाई यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या फिल्मी दुनियेत अखंड भारतीय चित्रपटसृष्टीचा ऐवज या चारदिवसीय कार्यक्रमात पर्यटकांना याची देही याची डोळा अनुभवता येत आहे. २८ एप्रिलपासून सुरुवात झालेल्या या महामेळाव्याच्या शुभारंभी ‘फिल्मी तडका विथ अवधूत गुप्ते’ हा शानदार कार्यक्रम खास पर्यटकांसाठी सादर करण्यात आला. त्यासोबतीला फिल्मीदुनियेची रंजक सफरदेखील प्रेक्षकांना याद्वारे करता आली. तसेच, दुसऱ्या दिवशी २९ एप्रिलला मराठी अभिनेत्री मानसी नाईकसोबत बॉलीवूडमधील काही सुप्रसिद्ध पात्रांची ‘फिल्मी धम्माल’ प्रेक्षकांना अनुभवता आली. याव्यतिरिक्त ३० एप्रिल रोजी दादासाहेब फाळके जयंतीप्रीत्यर्थ ‘दादासाहेब फाळके’ यांना अवधूत गुप्ते यांच्या दिमाखदार संगीत कार्यक्रमाद्वारे आदरांजली वाहण्यात येणार आहे. त्यानंतर या महाफिल्मोत्सवाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच १ मे, महाराष्ट्र दिनानिमित्त मराठमोळीशाही या कार्यक्रमाचा उपस्थितांनी मनमुराद आनंद लुटता येणार आहे. आदर्श शिंदे यांच्या भारदस्त आवाजात रंगलेल्या या कार्यक्रमाद्वारे फिल्मी दुनियेच्या महाफिल्मोत्सवाची सांगता करण्यात येईल.
महाराष्ट्र पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेली ही ‘फिल्मी सहल’ पर्यटकांसाठी पर्वणीच ठरली आहे. कारण, आपल्या लाडक्या सिने अभिनेत्याच्या सिनेजगतात वावरण्याची नामी संधी या सहलीमार्फत सिनेरसिकांना अनुभवता येत आहे. ऐतिहासिक चित्रपटासाठी उभारण्यात आलेले राजवाडे, गड-किल्ल्यांचे सेट्स तसेच अलिशान बंगल्यात रोमांचक सफर करता येत असून, सिनेमातील ही सारी दुनिया, त्यातील पात्र आणि बाजारपेठ वास्तव्यात जगण्याचा अनुभव येथे प्रेक्षकांना घेता येत आहे. एव्हढेच नव्हे तर, फिल्मी डान्स, सिंगिंग, कॉमेडी आणि खाओ जितो मुकद्दर का सिकंदर यांसारखे टेलेंट शोदेखील येत होत असल्याकारणामुळे उदयोन्मुख कलाकरांसाठी एन.डी. स्टुडीयोची हि फिल्मी दुनिया आपली प्रतिभा सादर करण्याची मोठी मुक्त व्यासपीठ ठरणार आहे.