‘एड्स’ विषयी नि:संकोचपणे बोलले पाहिजे
कलाकारांनी व्यक्त केले आपले मत आज जागतिक एड्स जनजागृती दिन विशेष आज १ डिसेंबर. हा दिवस जागतिक एड्स जनजागृती दिन म्हणून जगभरात पाळला जातो. जगभर फैलावलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी, यासाठी हा दिवस पाळावा असे जागतिक राष्ट्रसंघाने घोषित केले आहे. या विषयावर निःसंकोचपणे बोलले जात नाही. याठीच मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका या सर्वाधिक पॉवरफुल समजल्या जाणाऱ्या माध्मयातील, समाजातील सर्वच लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या कलाकारांचे या विषयावरील मत जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न. मालिका, चित्रपट व नाटक या प्रभावी माध्यमातून ‘एड्स’ सारख्या गंभीर विषयावर जनजागृती होऊ शकते का? किंवा ती अधिकाधिक प्रमाणात होते असे वाटते का ? हे या दिग्गजांकडून जाणून घेतले आहे.
या विषयावर घराघरात चर्चा घडायला हवी – शिल्पा नवलकर, लेखिका / अभिनेत्री खरं तर आपल्याकडे एड्स या विषयावरच मोकळेपणाने बोलले जात नाही. त्यामुळे नाटक, सिनेमा किंवा मालिका या माध्यमाद्वारे जनजागृती हा दुसरा टप्पा झाला. आपल्या समाजात एड्स हा विषय ‘सेक्स’शी संबंधीतच समजला जातो, म्हणून कदाचित याबाबत कुठेच चर्चा होत नसते. पण एड्स होण्याची कारणं ही विविध आहेत. एड्स म्हणजे सेक्स असा टॅगच लावला गेलाय. समाजात या विषयावर चर्चा होणे गरजेचे आहे. आज शाळांमध्ये ‘सेक्स एज्युकेशन’चा समावेश केला गेलाय. पण एड्स या विषयावर कमीच किंवा अपुर्ण माहितीच दिली जातेय. याबाबात संवाद घडायला हवा. आई-वडील आणि मुलांमध्ये, मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये. हा स्टिगमा काढला गेला पाहिजे. कलाकारांच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास फार कमी कलाकृती या विषयावर तयार केल्या गेल्या आहेत. काही सिनेमा तयार झाले मात्र याची संख्या फार कमी आहे. सिनेमा, नाटक, मालिका या माध्यमाद्वारे संदेश देता येत नाही, तर केवळ दाखवले जाते. शेवटी ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने समज घ्यायचा असतो.
शालेय अभ्यासक्रमात हा विषय असला पाहिजे – अशोक शिंदे, अभिनेता ‘एड्स’ या विकाराविषयी निश्चितच जनजागृतीची गरज आहे. ज्याप्रमाणे शालेय शिक्षणात सेक्स एज्युकेशन विषयी शिकवले जाते. त्याचप्रमाणे ‘एड्स जनजागृती’ हा विषय अभ्यासक्रमात असला पाहिजे. माननीय शिक्षणमंत्री विनोद तावडे हे माझे मित्र आहेत. मी त्यांना खासगीत भेटून या विषयी सल्ला देणार आहे.इतरविषयांप्रमाणेच आरोग्य हा विषय महत्त्वाचा आहे. कलाकारांच्या दृष्टीकोनातून जर का बोलायचे झाले, तर सिनेमा बघितलंच जातो असे नाही. पण ज्या मालिका सध्या गाजत आहेत त्यामध्ये हा विषय दाखवला गेला तरी खूप मोठा फरक पडू शकतो. मराठी, हिंदीमध्ये या विषयावर अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. हिंदीमध्ये ‘फार मिलेंगे’ हा सलमान खान, शिल्पा शेट्टी आणि अभिषेक बच्चन यांच्यावर चित्रित केलेला चित्रपट २००४ साली येऊन गेला. मात्र सर्वानांच चित्रपट पहाता येतोच असे नाही. वृत्तपत्र किंवा वृत्त वाहिनी यांमध्येही हे विषय मांडले गेले पाहिजेत. मात्र शालेय अभ्यासक्रम हा सर्वात महत्त्वाचा उपाय आणि गरज आहे असे मला वाटते.
तांत्रीक मर्यादांमुळे याविषयी मोकळेपणाने सांगता येत नाही – नम्रता गायकवाड, अभिनेत्री आपल्या भारतात खजुराहो सारखे शिल्प असुनही लैंगीग शिक्षणाच्या बाबतीत आपण मागास आहोत. लैंगिकतेबद्दल उघडपणे न बोलणे हे सभ्यतेशी जोडल्यापासून त्याकडे वेगळ्या पध्दतीने बघितले जाते. त्याच कारणामुळे लैंगीक अजारांबाबत जागरूकता नाही. एड्स हा त्यापैकीच एक रोग आहे. आज एड्स दिनानिमित्त तरी त्या बद्दल योग्यपद्धतीने जागरूकता निर्माण झाली पाहिजे. एड्स या विषयावर जाहिरात, चित्रपट या माध्यमातून अनेकदा प्रकाश टाकण्यात आला पण त्यालाही तांत्रीक मर्यादा असल्याने मोकळेपणाने प्रत्येक गोष्ट उलगडून सांगता येत नाही. अशावेळी एड्सबद्दल लोकांमध्ये असणारे अज्ञान सगळ्यात आधी दूर केले गेले पाहिजे. एड्स होण्याची कारणे, तो नेमका कशामुळे होतो. तो होऊ नये म्हणून खबरदारीचे उपाय, वेळोवेळी रक्ताची तपासणी करणे अशा पद्धतीने प्रत्येक नागरीकाला त्याबद्दल खबरदारीचे उपाय नीट समजावून सांगितले पाहिजे. ह्या एड्स दिनानिमित्ताने हे सगळं करण्यात आपण यशस्वी झालो तर भारतातून एड्स हद्दपार होईल यात शंका नाही.
सरकारी जाहिरातींचा स्तर सुधारावा – सुव्रत जोशी, अभिनेता एड्स या विषयावरील चित्रपट, नाटक नक्कीच आताच्या काळात स्वीकारले जातील असं मला वाटतं. हा विषय स्वीकारला जावो अथवा न जावो पण यावरच जो टॅबो आहे तो जाणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण एड्स झालेल्या व्यक्तीला अत्यन्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःहून येऊन डॉक्टरला सांगून त्याची ट्रीटमेंट घेणं, आणि ट्रीटमेंट सुरु असताना त्याच्या घरच्यांचा आणि मित्रमंडळींचा सपोर्ट मिळणं गरजेचं आहे. हे सर्व मला ठावूक असण्याचे कारण म्हणजे मी स्वतः ‘धूसर’ नावाची एक डॉक्यु-फिक्शन अशा चित्रपटात काम केलं होत. हा चित्रपट अनेक वर्षांपूर्वी प्रयास नावाची पुण्यात संस्था आहे जी ‘एड्स’ या विषयावरच काम करते, लोकांना मदत करते. त्यांच्या कुटुंबियांच्या किंवा इतर समाजातील लोकांना त्यांनी स्वतःचा टॅबू घालवावा आणि एड्स झालेल्या व्यक्तीकडे कशा पद्धतीने बघावं तसेच एड्स झालेल्या व्यक्तीने स्वतःकडे कस बघावं ? या विषयावरच हा चित्रपट आधारित होता. त्यावेळी त्यात काम करणाऱ्या नटांची कार्यशाळाही मी घेतली होती.
या चित्रपटाचा फॉर्म ज्याला आपण म्हणू तो आम्ही साधारण असा ठेवला होता, कारण मुळात दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला असा वाटतो कि सामाजिक विषयावर चित्रपट करताना तो कुठेही प्रचारकी होता काम नये. कारण मला मूलतः असं वाटतं कि कलेचं म्हणजेच चित्रपटाचा, मालिका किंवा नाटकाच काम हे कोणत्याही प्रकारचा संदेश देणं हे नाही आहे. एखाद्या पद्धतीचा अनुभव देणं आणि त्या अनुभवातून आपल्या विचारात आणि आपल्या आत्म्यात आपल्या जाणिवांमध्ये काही वडील झाले तर उत्तम आहे. तर त्यामुळे आमचाही प्रयत्न कुठलाही संदेश देणं किंवा सामाजिक प्रचार करणं असा त्या चित्रपटामागचा हेतूच नव्हता. म्हणूच या चित्रपटाचा फॉर्मचा आम्ही असा ठेवला होता कि काही नट आहेत, जे कार्यशाळा करत आहेत आणि कार्यशाळा करताना ते एड्स झालेल्या व्यक्तींच्या जीवनात येणाऱ्या विविध अनुभवांमध्ये स्वतःला ठेवून बघतात आणि ते प्रसंग एन-ऍक्ट करतायत. जेव्हा आपण स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवून बघतो त्यावेळी तुम्हालाच तुमचे एक व्यक्ती म्हणून डोळे उघडतात. तुमचे ज्ञानचक्षू उघडतात, वेगवेगळे विचार डोक्यात येतात ते काय? असा त्याचा फॉर्म होता. तर अशा प्रकारचे काही साहित्य, चित्रपट, मालिका निर्माण झालं कि ज्यामुळे मला एड्स झालेल्या व्यक्तीचं, त्याच्या कुटुंबीयांचं अनुभव विश्व उलगडलं जावं असं वाटत. या व्यतिरिक्त सरकारी जाहिराती असतातच पण त्याचा स्तर सुधारावा कारण त्या अत्यन्त बटबटीत, घाणेरड्या पद्धतीने समोर येतं. ती सुधारली जावी अशी माझी मनोमन इच्छा आहे.