आर्थिक परीक्षेच्या काळातही ‘व्हेंटिलेटरला’ प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद अकरा दिवसात केली अकरा कोटींची कमाई
केंद्र सरकारने मागच्या आठवड्यात पाचशे आणि हजारच्या चलनात असलेल्या नोटांवर बंदी आणली शिवाय बॅंकेमधून पैसे काढण्यावरही मर्यादा आली ज्याचा परिणाम विविध व्यापारावर आणि व्यवसायावर झाल्याचं दिसून येत आहे. एकंदरीत सर्वत्रच आर्थिक अडचणींचा आणि काटकसरीचा हा काळ सुरु झाला असला तरी अशाही परिस्थितीत ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणारा आणि सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलेल्या व्हेंटिलेटरने दुस-या आठवड्यातही आपली घोडदौड कायम ठेवली. काही ठिकाणी सिंगल स्क्रिन चित्रपटगृहात थोडासा परिणाम झाला असला तरी त्याची कसर मल्टीप्लेक्समध्ये भरुन निघतेय. ऑनलाईन बुकींग, नेट बॅंकींग आणि प्लास्टीक मनी इत्यादी पर्यायांचा वापर करुन प्रेक्षक चित्रपटाचा आनंद घेत आहेत हे विशेष. प्रेक्षकांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळेच व्हेंटिलेटरने मागील ११ दिवसांत अकरा कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे.
प्रेक्षकांच्या या प्रतिसादाबद्दल चित्रपटाच्या निर्मात्या डॉ. मधु चोप्रा म्हणाल्या की, “व्हेंटिलेटरला मिळणारा प्रतिसाद हा आमचा आत्मविश्वास वाढवणारा आणि मनात अभिमानाची भावना निर्माण करणारा आहे. मानवी भावना आणि कुटुंबव्यवस्थेवर सकारात्मक भाष्य करणा-या या चित्रपटाने प्रेक्षक भावूक तर होतच आहेत शिवाय त्यामध्ये स्वतःचा शोध घेत आहेत हे विशेष. प्रेक्षकांनी अशा प्रकारे चित्रपटाशी स्वतःला जोडून घेणं ही आमच्यासाठी निश्चितच आनंदाची बाब आहे. सर्वच समीक्षकांनी या चित्रपटाची प्रशंसा केली आहेच शिवाय चित्रपटक्षेत्रातील जाणत्या कलाकार तंत्रज्ञ मंडळींनाही हा चित्रपट भावला आहे ही समाधानकारक बाब आहे.”
चित्रपटाच्या या यशाबद्दल दिग्दर्शक राजेश मापुसकर म्हणाले की, “देशातील जनता एका आर्थिक विवंचनेतून जात असतांना आपलं यश साजरं करणं हे थोडसं संयुक्तिक ठरणार नाही परंतु याही परिस्थितीत ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाला मिळणा-या प्रतिसादाने मी भारावून गेलो आहे. विशेष म्हणजे चित्रपट बघितल्यानंतर प्रेक्षकांच्या मिळणा-या प्रतिक्रिया या थक्क करणा-या आहेत. बाप मुलाच्या नात्यावर आधारित हा चित्रपट अनेक कुटुंबातील वडील – मुलामध्ये संवादाचा दुवा बनत आहे. दोन पिढ्यांमध्ये असलेलं अंतर कमी करण्यात हा चित्रपट छोटीशी का होईना महत्त्वाची भूमिका बजावत आहे याचा मनोमन आनंद आहे.”
झी स्टुडिओजच्या मराठी चित्रपट विभागाचे बिझनेस हेड निखिल साने म्हणाले की, “मराठी चित्रपट सध्या सर्वच बाबतीत उल्लेखनिय कामगीरी करत आहे. गेल्या वर्षी दिवळाीमध्ये आम्ही ‘कट्यार काळजात घुसली’च्या माध्यमातून एक संगीतमय नजराणा प्रेक्षकांना दिला. त्या वेळीही हिंदीमधील तगड्या चित्रपटांची स्पर्धा असतानाही कट्यारने बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवलं. यावर्षी भारतीय कुटुंबव्यवस्था त्याची मुल्ये, वडील मुलाचं नातं यावर भाष्य करणारा ‘व्हेंटिलेटर चित्रपट आम्ही या दिवाळीत आण
ला ज्याने प्रेक्षकांच्या थेट काळजाला हात घातला. हजार-पाचशेच्या चलनी नोटांवरील बंदीच्या निर्णयाचा परिणाम या चित्रपटावर होऊ न देता प्रेक्षक इतर पर्यायांचा वापर करुन चित्रपटगृहात व्हेंटिलेटरचा आनंद घेत आहेत हे आमच्या दृष्टीने खुपच आशादायी चित्र आहे.”
हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून यातील दिग्दर्शक आणि कलाकारांनी मुंबईसह ठाणे, डोंबिवली, नाशिक, पुणे, अलिबाग अशा विविध शहरातील चित्रपटगृहांना भेटी दिल्या. या सर्व भेटीत त्यांना प्रेक्षकांच्या अतिशय भावूक प्रतिक्रिया मिळत आहेत.
आशुतोष गोवारीकर, सतीश आळेकर जितेंद्र जोशी, सुकन्या कुलकर्णी, सुलभा आर्या, निखिल रत्नपारखी यांसारख्या अनुभवी आणि हरहुन्नरी अभिनेत्यांबरोबरच जवळपास ७० च्या वर कलाकारांच्या बहारदार अभिनयाने सजलेल्या व्हेंटिलेटर चित्रपटाची निर्मिती प्रियांका चोप्रा आणि डॉ. मधु चोप्रा यांच्या पर्पल पेबल्सने केली असून मॅगीज पिक्चर्सने सहनिर्मिती केली आहे तर वितरण झी स्टुडिओजने केलं आहे. ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस आलेला हा चित्रपट सध्या २५८ चित्रपटगृहांतून ४१६५ शोद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे