सध्या छोटा पडदा गाजवत असलेली सचिन – स्वप्नील ची नंबर वन जोडी पुन्हा एकदा मोठ्या
पडद्यावर आपली कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकताच लाँच झालेल्या रणांगण चित्रपटाच्या टीझरमधून आतापर्यंत सोबत असणारी ही जोडी आता एकमेकांविरोधात उभी ठाकल्याचं लक्षात येतं आहे. एवढंच नाही तर सचिनजींना पितासमान मानणाऱ्या स्वप्नीलने चक्क सचिनजींविरोधात युध्द पुकारलं आहे. या युध्दामागची कारणं काय? कोणत्या परिस्थितीने या दोघांना रणांगणात एकमेकांविरोधात उभं केलं आहे? आणि या रणांगणात विजयी कोण ठरणार… या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं हळूहळू उलगडत जातील.
नुकताच लाँच झालेल्या टीझरमधून कैक नामी चेहरे अंधुक दिसत आहेत…. यावरूनच पुन्हा एकदा एक मल्टीस्टारर सिनेमा मराठीत येत असल्याचं आपण म्हणू शकतो. या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगांवकरांबरोबरच सुचित्रा बांदेकर, सिध्दार्थ चांदेकर, आनंद इंगळे आणि इतर कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
52 विक्स एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट,मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स्) आणि हार्वे फिल्म्स निर्मित रणांगण या चित्रपटाच्या निर्मितीचं शिवधनुष्य करिष्मा जैन आणि जॉय रंजन यांनी पेललं आहे. तर अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी आणि कार्तिक निशानदार यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक राकेश सारंग यांनी केले आहे.
गुरू ठाकूर आणि समीर सामंत लिखित चित्रपटाला साजेशी गाणी अवधूत गुप्ते, राहुल रानडे, शशांक पवार यांनी संगीतबध्द केली आहेत तर स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते, आनंदी जोशी आणि वैशाली माडे यांनी या गीतांना आपल्या स्वरांनी रंग भरले आहेत.
या कलियुगात बाप-मुलाला एकमेकांविरोधात उभं करणारा रणांगण हा चित्रपट येत्या 11 मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.