चित्रीकरणासाठी पुणे येथील डेक्कन, डेक्कन रेन्देझ्वौस हॉटेलमध्ये असताना तेजश्रीच्या रूममधून अचानक तिचा लॅपटॉप गहाळ झाला होता. सर्वसामान्य व्यक्तीची जशी अवस्था होईल अगदी तशीच अवस्था तेजश्रीची झाली होती. लॅपटॉपची चौकशी करण्यासाठी तेजश्री तसेच ‘असेही एकदा व्हावे’च्या टीमने त्यावेळी पूर्ण हॉटेल पालथे घातले होते. मात्र कुठेच काही पत्ता लागला नाही. त्यामुळे लॅपटॉप आता चोरीला गेला असून, पुन्हा तो मला कधीच मिळणार नाही, असे तेजश्रीने गृहीत धरले. मात्र, जसे नायिकेच्या मदतीला नायक धावून येतो अगदी तसेच अभिनेता उमेश कामत तेजश्रीसाठी धावून आला. त्याने चोरीला गेलेला लॅपटॉप चक्क शोधून काढला, आणि संपूर्ण टीमला लॅपटॉप चोर कोण हे समजले. हा चोर म्हणजे स्वतः उमेश कामतच होता !
याबद्दल बोलताना उमेश सांगतो कि, सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान तेजश्री अनेकवेळा वस्तू विसरून जात असे. तिच्या या विसरभोळ्या स्वभावामुळे मला आणि सुश्रुतला तिची गम्मत करावीशी वाटली. चित्रीकरण आटपून आम्ही सर्व हॉटेलमधून बाहेर पडलो होतो, त्यावेळी काहीवेळा नंतर तेजश्री हॉटेलच्या रुममध्ये लॅपटॉप विसरली असल्याचे तिला कळले. तिने याबाबत मला सांगितले. मी लगेच हॉटेलच्या रिसेप्शनवर फोन करत, लॅपटॉपची चौकशी केली. तेथे परत गेल्यावर हॉटेलच्या रिसेप्शनवर तेजश्रीचा लॅपटॉप सुखरूप ठेवला असल्याचे दिसले. त्याचवेळी कार्यकारी निर्माता आशुतोष हिंगेने मला फोन करून तेजश्रीला लॅपटॉप सापडल्याचे सांगू नकोस, आपण तिची गम्मत करूयात असे सुचवले. मग मी सुद्धा अगदी तसेच केले.’ असा मजेशीर किस्सा उमेशने सांगितला.
तेजश्रीला याबद्दल काही कल्पना नसल्यामुळे ती बिचारी अक्षरशः घाबरून गेली होती. लॅपटॉप मिळाला नाही म्हंटल्यावर तिचे हातपाय गळाले. एखादी महागडी वस्तू चोरीला गेल्यावर जशी प्रत्येकाची हालत होईल अगदी तशीच अवस्था तेजश्रीची झाली होती. सुश्रुत आणि आशुतोषनी तिला रडकुंडीला आणलं होतं. तिची ही रडवेली अवस्था पाहता अधिक काळ हे प्रकरण न ताणता उमेश आणि सुश्रुतने तिला लॅपटॉप मिळाला असल्याचे सांगितले, आणि तिचा जीव भांड्यात पडला.
उमेश- तेजश्रीची लव्हकेमिस्ट्री मांडणाऱ्या या सिनेमाची मधुकर रहाणे यांनी निर्मिती केली असून,त्यांना रविंद्र शिंगणें यांचे सहकार्य लाभले आहे. येत्या ६ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात शर्वाणी पिल्लई, डॉ. निखील राजेशिर्के, चिराग पाटील,कविता लाड आणि अजित भुरे हे कलाकारदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहे.