Marathi News

‘अशी ही आशिकी’च्या निमित्ताने सोनूने पहिल्यांदा गायली एकाच सिनेमातील सर्व गाणी

 

गोड गळ्याचा गायक सोनू निगमने आपल्या आवाजानं सगळ्यांच्याच मनात हक्काचं घर केलं आहे. गेली कित्येक वर्ष सोनू निगमची गाणी संगीतप्रेमींना अक्षरश: वेड लावत आहेत. अमराठी गायक मराठी गाणी तितक्याच ठसक्यात कसा गाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे सोनू निगम. आतापर्यंत सोनू निगमने गायलेली सदाबहार गाणी तरुणाईलाही देखील भुरळ पाडते. असा गोड आवाज असलेला आणि तितकाच दिसायला ही गोड असणा-या सोनू निगमने पहिल्यांदाच मराठी सिनेमातील सर्व गाणी गायली आहेत. आणि ती गाणी एका पेक्षा एक हटके आणि रोमँटिक आहेत. सोनूचा आवाज किती गोड आणि रोमँटिक आहे हे आपण अनेक गाण्यांतून अनुभवलंय पण जर ‘आशिकी’ सारख्या विषयावर आधारित सर्वच गाणी सोनू गाणार म्हणजे तरुण मंडळी पुन्हा एकदा सोनूवर फिदा होणार हे नक्की.
‘टी-सिरीज’ची मराठीतील पहिलीच निर्मिती असलेल्या, सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ या सिनेमात सोनू निगमने पहिल्यांदाच मराठी सिनेमासाठी एकाच सिनेमातील सर्व गाणी गायली आहेत. गुलशन कुमार प्रस्तुत, टी-सिरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार निर्मित ‘अशी ही आशिकी’ या सिनेमात एकूण पाच गाणी आहेत. त्यापैकी ‘रक्कमा’, ‘तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’ आणि ‘समझे क्या?’ ही तीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहेत.
दिग्दर्शनासह सचिन पिळगांवकर यांनी या सिनेमातील गाण्यांना संगीतही दिले आहे. सिनेमा आणि संगीत दिग्दर्शित करत असलेले सचिनजी यांच्या सिनेमात सोनू निगमने सगळीच गाणी गायली आहेत, हे पहिल्यांदाच घडलंय. सचिनजी आणि सोनू निगम यांचं नाव एकत्र जरी उच्चारलं तरी सर्वप्रथम डोळ्यासमोर येते ते म्हणजे सोनू निगमने गायलेलं ‘हिरवा निसर्ग’ हे लोकप्रिय गाणं. ‘हिरवा निसर्ग…’ या गाण्यापासून ते या सिनेमातील ‘तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’ या टायटल ट्रॅकला प्रेक्षकांकडून पसंतीची पावती मिळाली आहे.
‘अशी ही आशिकी’ सिनेमात सोनूने गायलेले ‘रक्कमा’ आणि ‘तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’ ही गाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. सोनू निगमचा आवाज आणि संगीत दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी गाण्यांना दिलेली चाल प्रेमीयुगुलांसाठी स्पेशल गिफ्ट ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button