अंकुशचा अतरंगी लूक व्हायरल
प्रत्येक सिनेमातून आपले वेगळेपण जपणारा मराठीचा ‘स्टाईल आयकॉन’ अंकुश चौधरी लवकरच एका नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. आतापर्यंत त्याने केलेल्या सिनेमातील विविध व्यक्तिरेखांमध्ये फिट आणि फाईन बसलेला अंकुश त्याच्या आगामी ‘देवा’ या सिनेमातून झळकत असून, यात तो एका अतरंगी लूकमध्ये दिसेल.
या चित्रपटातील अंकुशची एक हलकी झलक नुकतीच सोशल मीडियावर वायरल झाली आहे. प्रत्येकवेळी काहीतरी नवीन करण्याचा अट्टहास बाळगणाऱ्या अंकुशच्या या न्यू लुकला नेटीजन्सकडून चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे. रंगीत सदरा, फेन्सी लॉकेट, हातात माळ, इयररिंग्स आणि केसात कोरलेला व्ही शेप असा ‘देवा’चा प्राथमिक लूक यात पाहायला मिळतो, अर्थात अंकुशचा हा अतरंगी लुक त्याच्या चाहत्यांना भुरळ पाडणारा ठरत आहे.
इनोव्हेटिव्ह फिल्मस आणि प्रमोद फिल्मस् यांची संयुक्त निर्मिती असलेल्या या सिनेमाचे सध्या कोकणात चित्रीकरण सुरु आहे. साऊथचे सुप्रसिध्द दिग्दर्शक मुरली नलप्पा यांच्या दिग्दर्शकीय नजरेतून आकारास येत असलेला ‘देवा’ अंकुशच्या स्टाईल आयकॉनला चारचाँद लावणारा ठरेल यात शंका नाही.