Marathi Newsnewshunt
१ मे च्या निमित्ताने असा ही एक ‘ड्राय डे’
आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘ड्राय डे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘ड्राय डे’ या नावामुळेच अधिक चर्चा होत असलेल्या या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख नुकत्याच पार पडलेल्या १ मे, महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर जाहीर करण्यात आली. गतवर्षी १० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होऊ न शकलेल्या ‘ड्राय डे’ सिनेमाला, सेन्सॉरच्या नियमावलीमुळे प्रतीक्षा करावी लागली होती. मात्र, अखेरीस हि प्रतीक्षा आता संपली असून, संजय पाटील यांची निर्मिती असलेला हा सिनेमा १३ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात झळकणार असल्याचे सोशल नेटवर्कींग साईटद्वारे सांगण्यात आले आहे.
.आजच्या तरुणपिढीचे भावविश्व मांडणारा हा सिनेमा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरणार हे निश्चित ! कारण संगीतदिग्दर्शक अश्विन श्रीनिवासन यांनी संगीतबद्ध केलेल्या या सिनेमातील ‘अशी कशी’ आणि ‘गोरी गोरी पान’ या सुपरहीट गाण्यांनी रसिकांची मने यापूर्वीच जिंकली असल्यामुळे, ‘ड्राय डे’ सिनेमाची उत्कंठा सिनेप्रेक्षकांना लागली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतल्या या आगळ्यावेगळ्या ‘ड्राय डे’ चे लेखन दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनीच केले असून, नितीन दीक्षित यांनी पटकथा व संवाद लिहिले आहेत. डीओपी नागराज दिवाकर यांच्या कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या या सिनेमाचे संकलन अमित कुमार यांनी केले आहे. तरुणाईवर आधारीत असलेल्या या सिनेमात ऋत्विक केंद्रे, कैलाश वाघमारे, योगेश माधव सोहनी, पार्थ घाडगे, चिन्मय कांबळी, मोनालिसा बागल, आयली घिए,अरुण नलावडे आणि जयराम नायर हे कलाकार आपल्याला पहायला मिळणार आहेत.