अतिशय वास्तववादी आणि विचार करायला लावणारा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर ‘सिनिअर सिटीझन’ या चित्रपटातील ‘किलर’ हे नवीन गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे अमृता पवार या अभिनेत्रीवर चित्रित करण्यात आले असून स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया, गौरीश शिपूरकर, सुयोग्य गोऱ्हे यांनी तिला या गाण्यात साथ दिली आहे. ‘किलर’ सॉन्ग आजच्या तरुणाईला केंद्रित ठेवून तयार केले आहे. अंबरीश देशपांडे यांनी आजच्या तरुणाईला आवडेल आणि सहज तोंडावर रुळेल असे इंग्लिश आणि मराठी भाषेतील शब्द वापरून हे गाणे लिहिले आहे. या अनोख्या गाण्याला अभिजित नार्वेकर यांनी साजेसे असे थोडे वेस्टर्न टच असलेले संगीत दिले असून दर्शना मेननच्या आवाजाने या गाण्याला चारचांद लावले आहे. महाविद्यालयीन नृत्यस्पर्धेसाठी नृत्याचा सराव सुरु असतानाच चित्रपटाची कथा या गाण्यातूनच पुढे सरकताना दिसते. या चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शक अमित बाइंग यांनी केले आहे. ‘किलर’ गाण्यात एका सीनमध्ये सरावा दरम्यान कोरिओग्राफर स्टेजवर येऊन डान्सच्या स्टेप शिकवतो. या सीनसाठी अमित बाइंग यांना ऐनवेळी तयार करून त्याला स्टेजवर पाठवले आणि हा सीन चित्रित केला. शेवटच्या क्षणी दिग्दर्शक अजय फणसेकर यांना ही कल्पना सुचली आणि त्यांनी ती लगेचच अंमलात आणली.
निवृत्त लष्कर अधिकारी अभय देशपांडे आपल्या पत्नीसोबत निवृत्तीनंतरचे निवांत आयुष्य जगत असतांनाच एक अघटित घटना घडून या देशपांडे दाम्पत्यांच्या आयुष्यात वादळ निर्माण होते. आता नक्की कोणती घटना घडते? देशपांडे पती पत्नी त्याचा सामना कसा करतात? यासाठी १६ डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
‘सिनिअर सिटीझन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय फणसेकर यांनी केले आहे. तर माधुरी नागानंद आणि विजयकुमार नारंग निर्मित या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, स्मिता जयकर, सुयोग गोऱ्हे, अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया, किरण तांबे, अमोल जाधव, गौरीश शिपूरकर, हर्षल पवार हे कलाकार या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका निभावताना दिसणार आहेत. ‘सिनियर सिटीझन’ या चित्रपटात क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून राजू सावला यांनी तर एक्झिक्टिव्ह प्रोड्युसर म्हणून प्रमोद सुरेश मोहिते यांनी काम पहिले आहे.