बॉलीवूड निर्माते वर्षाच्या पहिल्या शुक्रवारला खूप घाबरतात. पहिल्या शुक्रवारी फिल्म रिलीज झाली की, ती हिट होत नाही असा बॉलीवूडचा समज आहे. पण 2018च्या सुरूवातीला संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ रिलीज झाली आणि संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीसाठी शुभशकून झाला. ‘ये रे ये रे पैसा’ने बॉक्स ऑफिसवर पैशाचा पाऊस पाडला. आणि वर्षाची चांगली सुरूवात झाल्याचे संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीने म्हटले.
प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेल्या ‘ये रे ये रे पैसा’ चित्रपटावर आता अवॉर्ड फंक्शन्समध्ये पुरस्कारांची बरसात होत आहे. ‘ये रे ये रे पैसा’ सिनेमाला झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ठ चित्रपट, सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.
ह्याविषयी दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, “हे तीनही पुरस्कार मी माझ्या प्रेक्षकांना समर्पित करतो. त्यांनी आमच्या चित्रपटाला प्रेम दिलं, त्यामूळे आम्हांला मिळालेले हे यश आहे. समीक्षकांकडूनही प्रशंसाप्राप्त असलेल्या ह्या चित्रपटाला आता झी टॉकीजचा मानाचा पुरस्कार मिळाला आहे, मी त्यांचा आभारी आहे.”
‘ये रे ये रे पैसा’च्या ह्या घवघवीत यशानंतर आता सर्वांचे लक्ष संजय जाधव ह्यांच्या नुकत्याच घोषित झालेल्या ‘लकी’ ह्या चित्रपटाकडे लागले आहे. ह्या सिनेमाची स्टारकास्ट कोण असेल ह्याची सध्या फिल्म इंडस्ट्रीत उत्सुकता आहे.