व्हेंटिलेटरचा प्रवास खडतर पण आनंददायी – कुनिका सदानंद 


पर्पल पेबल पिक्चर्स यांचा मराठी चित्रपट “व्हेंटिलेटर” येत्या 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या दिग्गजांपैकी एक नाव म्हणजे कुनिका सदानंद… त्यांच्याशी मारलेल्या या खास गप्पा…

1.       प्रियांका चोप्राचा पहिला – वहिला मराठी चित्रपट ‘व्हेंटिलेटर’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. हिंदी मराठी सिनेसृष्टीतले बरेच दिग्गज या सिनेमाशी जोडले गेले आहेत. त्यापैकी एक नाव तुमचं आहे. कार्यकारी निर्मात्या म्हणून तुम्ही या चित्रपटाशी जोडल्या गेल्या आहात… काय सांगाल या प्रवासाविषयी…

हा प्रवास खूप सुंदर होता. व्हेंटिलेटर सारखा विषय इतक्या गंमतीशीर पध्दतीने मांडण्याचं राजेश मापुसकर यांचं कसब… त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. चित्रपटाचं चित्रिकरण खूप कठीण होतं. हॉस्पिटलमध्ये शूट, एवढे कलाकार, त्या सगळ्यांचं मॅनेजमेंट…तारेवरची कसरत होती. आणि आज आम्ही यशस्वीरीत्या या ठिकाणी येऊन पोहोचलोय, ही खरंच खूप आनंदाची बाब आहे.

2. प्रियांका एक उत्तम अभिनेत्री आहे आणि आता ती एक निर्माती म्हणून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवते आहे. प्रियांका अभिनेत्रीच्या भूमिकेत तुम्हाला जास्त आवडते की निर्मातीच्या?

ही इंडस्ट्री अशी आहे जिथे शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. प्रियांका अभिनेत्री म्हणून उत्कृष्ट आहे आणि म्हणूनच ती निर्माती म्हणून पण चांगल्या चित्रपटांची निर्मिती करेल यात शंका नाही. माझं उदाहरण द्यायचं झालं तर मी अभिनेत्री म्हणून बरीच वर्ष इंडस्ट्रीत आहे आणि जेव्हा मी अभिनेत्री च्या भूमिकेतून निर्मितीकडे वळले त्यानंतर माझ्यात एक अभिनेत्री म्हणून खूप सकारात्मक बदल झाले. मी निर्मात्यांच्या अडचणी अधिक संवेदनशील होऊन समजून घेऊ लागले. हा बदल प्रत्येक अभिनेत्याने नक्की अनुभवावा.

3. पर्पल पेबल पिक्चर्सची पुढची वाटचाल कशी असणार आहे? यापुढेही मराठी निर्मिती करण्याचा विचार आहे का?

मराठीत एखादी चांगली संहिता आली, तर नक्कीच करू. आम्ही सध्या प्रादेशिक भाषांमधल्या चित्रपटांकडे विशेष लक्ष देत आहोत. भारतीय संस्कृती प्रादेशिक भाषांमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने प्रियांकाने पर्पल पेबल पिक्चर्स या सिनेसंस्थेची सुरूवात केली आहे. आम्ही भोजपुरी चित्रपट केला, आता आमचा पहिला मराठी चित्रपट व्हेंटिलेटर येत आहे. आणि यानंतर एक पंजाबी चित्रपटाची निर्मितीही आम्ही करत आहोत. प्रादेशिक भाषांमधील कोणत्याही चांगल्या संहितेचा विचार आमच्याकडून नक्कीच केला जाईल.

4. अभिनेत्री म्हणून आम्ही सगळ्यांनी तुम्हांला नेहमीच पसंत केलं आहे… मात्र पडद्यावरून आता तुम्ही ब्रेक घेऊन पडद्यामागे कार्यरत आहात… तर आता पुन्हा आम्ही तुम्हाला पडद्यावर केव्हा पाहू शकू?

मला अभिनय खूप आवडतो. मात्र सध्या मी इतर गोष्टींमध्ये व्यस्त आहे. आता व्हेंटिलेटरच्या प्रदर्शनानंतर पंजाबी सिनेमाचे प्रदर्शन आम्ही करणार आहोत. त्यानंतर अजून काही चित्रपटांच्या संहितेवर काम चालू आहे. या सगळ्यात माझ्या क्षमतेला साजेशी एखादी भूमिका मला मिळाली तर ती मी नक्कीच करेन

Exit mobile version