Marathi News

‘वेडिंगचा शिनेमा’च्या यशानंतर सलील कुलकर्णी यांचा आगामी चित्रपट ‘एकदा काय झालं’ची घोषणा…

saleel kulkarni

‘वेडिंगचा शिनेमा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाच्या मध्यामातून दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या प्रख्यात संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी रसिक प्रेक्षक आणि चाहत्यांबरोबर आणखी एक गुपित शेअर केले आहे. सलील कुलकर्णी यांनी त्यांचा दुसरा मराठी चित्रपट ‘एकदा काय झालं’चे पोस्टर सोशल मीडिया च्या माध्यमातून प्रसिद्ध केले आहे.

 

‘वेडिंगचा शिनेमा’ने भारतात आणि परदेशांतसुद्धा रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळवला. या निखळ विनोदी चित्रपटाचा मोठ्या प्रमाणावर बोलबाला झाला आणि रूढार्थाने सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून प्रस्थापित झाले. हे यश ताजे असतानाच ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मिडियावर झळकले आणि रसिकांची उत्सुकता पुन्हा एकदा जागृत झाली आहे.

गजवदन प्रॉडक्शन्स आणि शो बॉक्स एंटरटेन्मेंट या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. पहिल्या चित्रपटाप्रमाणेच सलील कुलकर्णी‘एकदा काय झालं’मध्येही लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार या विविधांगी भूमिकेत रसिकांसमोर येणार असून २०२०च्या उन्हाळ्यात हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.

पारंपारिक रीतीरिवाजांपासून आधुनिक फॅशन-तऱ्हा आणि पद्धती यांचा मिलाफ आणि त्यातून भरपूर कौटुंबिक मनोरंजन देणारा चित्रपट म्हणून ‘वेडिंगचा शिनेमा’चे कौतुक झाले. मुक्ता बर्वे, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, भाऊ कदम, शिवराज वायचळ , ऋचा इनामदार या कलाकारांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन सलील कुलकर्णी यांचे होते. या सर्वच आघाड्यांवर स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध केल्याची प्रतिक्रिया समीक्षक आणि प्रेक्षकांमध्ये उमटली होती. त्यामुळेच ‘एकदा काय झालं’बद्दलही रसिकांमध्ये आत्ताच उत्कंठा निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button