‘विकता का उत्तर’च्या सेटवर साजरी झाली दिवाळी


मराठी टेलिव्हिजनवर आतापर्यंत अनेक गेम शो आले. मात्र, विकता का उत्तर’ हा त्या सर्वांपेक्षा नक्कीच वेगळा आहे. जिंकण्यासाठी भाव करावा लागणं या अनोख्या संकल्पनेवर आधारित असलेल्या याकार्यक्रमाची दिवाळी देखील अशीच अनोख्या पद्धतीने साजरी झाली. दिवाळीच्या विशेष भागात स्टार प्रवाहाच्या कुटुंबासोबत मोठ्या दिमाखात  दिवाळी साजरी करण्यात आली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातीलसर्वसामान्यांना सेलिब्रिटी बनवणारा हा गेम शो असल्यामुळे यंदाची दिवाळी ‘विकता का उत्तर’ च्या सेटवर चांगलीच गाजली. संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण असलेल्या या सणाच्या मुहूर्तावर रितेश देशमुखनेआपल्या खुमासदार सूत्रसंचालनाच्या आधारे स्पर्धकांना दिवाळीची विशेष भेट देखील दिली. दर शुक्रवार ते रविवार संध्याकाळी साडेसात वाजता प्रदर्शित होत असलेल्या या शोचा हा आठवडा दिवाळी विशेषअसणार आहे.

शुक्रवारच्या या दिवाळी विशेष भागात ”विकता का उत्तर’ च्या सेटवर स्टार प्रवाहांच्या ताऱ्यांची झगमगाट पाहायला मिळेल. तर शनिवारी आणि रविवारी रितेश स्पर्धकांसोबत आणि ट्रेडर्ससोबतदिवाळी साजरी करणार आहे.
स्टार प्रवाहाच्या या नव्या प्रवाहात ‘आता थांबायचं नाय’ हे ब्रीद अंगी बांधून उतरलेल्या कलाकारांनी देखील या गेम शोमध्ये भाग घेतला होता. सध्या गाजत असलेल्या ‘नकुशी’ आणि ‘गोठ’  मालिकेतील मुख्यकलाकारांनी या गेममध्ये भाग घेत कार्यक्रम रंगात आणला. नव्या दमाच्या आणि अभिनयसंपन्न अशा या नवोदित कलाकारांसोबत रितेशने देखील या दिवाळी भागात चारचाँद लावले. दिवाळीच्या या विशेष भागात’विकता का उत्तर’ च्या सेटवर प्रसिद्ध मराठी अभिनेता उपेंद्र लिमये याचे आगमन प्रेक्षकांना अचंबित करणारे ठरणार आहे. स्टार प्रवाहच्या कुटुंबात उपेंद्र लिमये नेमके काय करत आहेत, हे सध्या गुपित असून, तेनेमके गुपित काय आहे… हे लवकरच कळेल. पण तूर्तास ‘विकता का उत्तर’ च्या सेटवरील दिवाळी सेलिब्रेशनचा आनंद लुटुयात.

Exit mobile version