विकता का उत्तर’च्या सेटवर कोण ठरणार वजनदार, सई की प्रिया?

‘आता थांबायचे नाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन मनोरंजनाच्या प्रवाहात पुन्हा एकदा जोमात उतरलेल्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘विकता का उत्तर’ या क्वीजशोला संपूर्ण महाराष्ट्रातून रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सामान्य माणसांना सेलिब्रिटी बनवणाऱ्या या भन्नाट शोने अनेक स्पर्धकांना मालामाल केले आहे. बुद्धिमत्ता आणि व्यवहारकुशलतेच्या या वजनदार गेम शोमध्ये मराठी सिनेसृष्टीतील वजनदार अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांनी नुकताच भाग घेतला. एका सामाजिक संस्थेला मदत म्हणून या दोघींनी ‘विकता का उत्तर’च्या विशेष भागात सहभागी होऊन किती कमाई केली हे  शुक्रवारी ११ नोव्हेंबरला पाहता येईल.

या विशेष भागात सई आणि प्रियाने रितेश देशमुख सोबत भरपूर धम्माल केली, गप्पांच्या ओघात या दोघीनी आपल्या जुन्या आठवणीदेखील सेटवर शेअर केल्या.विशेष म्हणजे प्रियाच्या वाढलेल्या वजनाबद्दल एक गोड खुलासा सईने या भागात केला आहे. शुक्रवारी होणाऱ्या या विशेष भागात रितेशने या दोघींमध्ये गुलाबजाम खाण्याची स्पर्धा देखील ठेवली. एवढेच नव्हे तर उत्तरांसाठी ट्रेडर्ससोबत ‘भाव’ करण्याची मज्जा देखील त्यांनी लुटली. दर शुक्रवार ते रविवार स्टार प्रवाह वाहिनीवर ७. ३० वाजता प्रसारित होत असलेल्या या कार्यक्रमाचा हा विशेष भाग येत्या शुक्रवारी, ११ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांना पाहता येईल.

Exit mobile version