आजच्या युगात जर देव या संकल्पनेशी मानवी मनातील भावना जोडल्या तर माणसातल्या ‘देवा’ ची अनुभूती प्रत्येकाला होईल. वंचितांसाठी धावून जाणारा, लोकांचे विघ्न हरणारा असा हा देव माणसांमध्येदेखील आपणास पाहायला मिळतात. आपल्या आजूबाजूला अशी अनेक देवमाणूस आहेत, जी ‘देवा’सारखी लोकांच्या मदतीला धावून येतात. अश्याच काही माणसांतल्या देवांची दखल महाराष्ट्रात गाजत असलेल्या अंकुश चौधरीच्या ‘देवा’ या सिनेमाने घेतली. स्माईल प्लस सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश मालखरे यांचे समाजकार्य सर्वश्रुत असून, त्यांच्या फेसबुक पेजवरील व्हीडीयोद्वारे त्यांनी अनेक दिनदुबळ्या लोकांना मदत केली असल्याचे दिसून येते. त्यांच्या या कार्याला पाठींबा देण्यासाठी मराठीचा सुपरस्टार अंकुश चौधरीने योगेश मालखरे आणि त्यांच्या २४ सहकारी मित्रांची खास पुण्यात जाऊन गळाभेट घेतली.
इनोव्हेटिव्ह फिल्म आणि प्रमोद फिल्म निर्मित ‘देवा’ या सिनेमात अंकुशने वठवलेली भूमिका, योगेश मालखरे यांच्या कार्याशी अगदी सलंग्न आहे. तसेच खुद्द अंकुशदेखील अगदी तसाच असल्याकारणामुळे ख-या आयुष्यातील ‘देवा’सोबत, सिनेमाचा हेतू सार्थकी लावण्याचा प्रयत्न या भेटीद्वारे करण्यात आला. अंकुशने या सर्वांसोबत ‘देवा’ सिनेमाचा आस्वाददेखील लुटला. शिवाय स्माईल प्लस सोशल फाउंडेशनच्या अखत्यारीस राबवलेल्या सेवांचे कौतुकदेखील केले. मुरली नलप्पा दिग्दर्शित ‘देवा’ या सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्रात तुफान प्रसिद्धी मिळत असून, अल्पावधीतच या सिनेमाने रसिकांच्या मनात जागा मिळवली आहे.