चॉकलेट बॉय अशी इमेज असलेल्या अनिकेत विश्वासराव आणि ब्युटिफुल स्नेहा चव्हाणला त्यांच्या साखरपुड्यानंतर सिल्व्हर स्क्रिनवर पहिल्यांदाच पाहण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे. पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तुत ‘हृदयात समथिंग समथिंग’ ह्या मराठी सिनेमातून स्नेहा चव्हाण आणि अनिकेत विश्वासराव दिसणार आहेत.
स्नेहा चव्हाणला अनिकेतविषयी विचारल्यावर ती म्हणते, “मी अनिकेतला हृदयात समथिंग समथिंगच्या चित्रीकरणावेळी पहिल्यांदा भेटले. आमच्या सिनेमाचं आळंदी, पूणे, मुंबई आणि गोव्याला चित्रीकरण झाले आहे. गोव्यातल्या चित्रीकरणादरम्यान आमची मैत्री झाली. हा सिनेमा माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.”
अनिकेत विश्वासराव सांगतो, “स्नेहाला भेटायच्या अगोदर मी तिचं नाटक किंवा सिनेमातलं काम पाहिलं नव्हतं. पण ती मेहनती, प्रामाणिक आणि प्रतिभावान अभिनेत्री असल्याचं तिच्यासोबत काम करताना मला जाणवलं. गोव्याच्या चित्रीकरणादरम्यान मला आयुष्यभरासाठीची मैत्रीण मिळाली.”
बॉन्डिंग नक्की कशी झाली असं विचारल्यावर अनिकेत म्हणतो, “ आम्ही दोघंही खव्वय्ये आहोत. ही गोष्ट सोडल्यास बाकी आम्ही एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहोत. मी अंतर्मुख आहे. तर ती खूप मिळून-मिसळून राहणारी, उत्साही, मस्तीखोर, साहसी मुलगी आहे.”
नुकतीच सोशल मीडियावरून अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण आणि प्रियंका जाधव ह्याची कॅरेक्टर पोस्टर्स रिवील झाली आहेत. ह्याशिवाय अजून कोण ह्यासिनेमात आहे, ह्याविषयी सध्या उत्सुकता आहे.
पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तुत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे ह्यांची निर्मिती असलेला प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण आणि प्रियंका जाधव ह्यांच्या अभिनयाने सजलेला ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट 5 ऑक्टोबर 2018ला रिलीज होणार आहे.