Marathi News
बाप-लेकीच नात उंचावणार क्षितीज: KSHITIJ Marathi Movie
“सिनेमाला ऑन लोकेशनवर बॅगराऊंड साऊंड दिल्याने त्यामध्ये नैसर्गिक शुध्दता व भावनात्मकता टिकून राहते” -रहसुल पोकुट्टी
वेगवेगळ्या पद्धतीने नात्यांचा आलेख प्रेक्षकांसमोर उलगडणारं सिनेमा अतिशय मार्मिक माध्यम आहे. सततचा दुष्काळ, आणि दुष्काळामुळे निर्माण होणारी गरिबी, गरिबीमुळे शेतकऱ्यांचे होणारे हाल या सर्व गोष्टी दररोज आपण वर्तमानपत्रात वाचतोच. झपाट्याने बदलणारी शहरं आणि ओसाड पडत जाणारी गावे या दोन्ही गोष्टींची सांगड घालणारा “क्षितिज” हा सिनेमा. बाप-लेक या दोघांनी मिळून विपरीत परिस्थितीशी आपला उद्देश साध्य करण्यासाठी दिलेल्या लढ्याची गोष्ट या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचा एक भाग नुकताच जामखेड तालुक्यातील नानज या गावी चित्रित करण्यात आला. गावी पारंपारिक पद्धतीने होत असलेल्या विठ्ठलाचे भजन चित्रित झाले. जागतिक किर्तीचे ऑस्कर पुरस्कार विजेते साउंड डिझायनर रहसुल पोकुट्टी यांनी या सिनेमासाठी चित्रीकरणाच्या ऑनलोकेशनवर लाइव्ह बॅग्राऊंड साउंड रेकॉर्ड केले. मराठी सिनेमात ऑनलोकेशन बॅग्राऊंड साऊंड रेकॉर्ड करण्याची ही पहिलीच वेळ आहे. टाळ, मृदुंग, चिपळ्याचा वाद्यवृंद, भजनमंडळींचे स्वर आणि भारलेल्या वातावरणाचा आनंद या सिनेमातून प्रेक्षकांना पहिल्यांदाच अनुभवता येणार आहे. क्षितिज सिनेमातील या ऑनलोकेशन रेकॉर्ड होणाऱ्या गाण्याने मराठी चित्रपटक्षेत्रात अनोखा प्रयोग केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना ऑस्कर पुरस्कार विजेते रहसुल पोकुट्टी म्हणाले की, चित्रपट सृष्टीच्या तंत्रज्ञानात झपाट्याने बदल घडत आहे. मात्र सिनेमाच्या साऊंडच्या बाबतीत काही दोन-तीन वर्षापासून बदल घडण्यास सुरुवात झाली आहे. सिनेमाची शुटिंग झाल्यानंतर त्या सिनेमाला बॅगराऊंड साऊंड दिला जातो. मात्र मराठी सिनेमात क्षितिजच्या माध्यमातून हा पहिला प्रयोग आहे की, शुटिंगच्या ऑनलोकेशनवर बॅग्राऊंड साऊंड दिल्याने त्यामध्ये एक वेगळ्या प्रकारे नैसर्गिक शुध्दता व भावनात्मकता टिकून राहते व तो सिनेमा प्रेक्षकांच्या मनाला भावतो. सिनेमाच्या साऊंड बाबत वेगवेगळे प्रयोग करण्याचा माझा प्रयत्न सतत चालू आहे. हा प्रयोग हॉलीवुड व बॉलिवुडच्या सिनेमात करण्यात आला आहे. प्रेक्षकांना घरीपण सिनेमा उपलब्ध होतो. मात्र प्रेक्षक डॉल्बी साऊंडकडे आकर्षित होऊन सिनेमागृहात येतात व चित्रपट पहाण्याचा एक वेगळा समाधान त्यांना प्राप्त होतो.
मनोज कदम दिग्दर्शित या सिनेमात अभिनेता उपेंद्र लिमये, मनोज जोशी, कांचन जाधव, संजय मोने, विद्यादर जोशी, वैष्णवी तांगडे, राजकुमार तांगडे आणि बालकलाकार अर्णव मंद्रूपकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. युएसए बेस्ट मिडिया फिल्म्स क्राफ्ट कंपनीच्या निर्मात्या नवरोझ प्रसाला आणि करिष्मा महादोलकर यांचा हा पहिला सिनेमा असून, दोघे मिळून या सिनेमाची निर्मिती करणार आहे. योगेश राजगुरू यांनी छायाचित्रिकरणाची तर मंजिरी पेंढारकर आणि नंदू गवळे कार्यकारी निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. सध्या या सिनेमाचं चित्रीकरण सुरु असून येत्या वर्षात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.