गेले 45 दिवस अभिनेता माधव देवचके बिग बॉसच्या घरात आपल्या संयमी आणि समजंस वागणूकीने आपलं स्थान बळकट करताना दिसतोय. क्रिकेटर माधव देवचकेचे स्पोर्टसमन स्पिरीट बिग बॉसचा गेम खेळताना कामी येतंय. आणि सोशल मीडियावरून सध्या माधवविषयी उमटत असलेल्या असंख्य प्रतिक्रियांनी हेच दिसून येतंय.
कलर्स मराठी वाहिनी, इन्डमॉल शाइन तसेच माधव देवचकेच्या अकाउंटवर सध्या बिग बॉस पाहणा-या प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचा ओघ सुरू आहे. ह्यातल्या बहुतेक प्रेक्षकांनी माधवला ‘स्टार परफॉर्मर’ म्हटलं आहे. माधव वेळोवेळी घरच्यांना कसा सांभाळून वागतो. तसेच एकही अपशब्द न बोलता कसा खेळतो, ह्याविषयी प्रेक्षकांनी त्याची पाठ थोपटली आहे.
सूत्रांच्या अनुसार , बिग बॉस शक्तीने नाही तर युक्तीने आणि शांतपणे खेळला जाऊ शकतो, हे माधवने वेळोवेळी दाखवले आहे. माधवचे फिल्म इंडस्ट्रीतही शत्रू नाहीत. किंबहूना त्याला ते बनवता येतच नाहीत. त्याचा मनमिळावू आणि सर्वांसोबत मिळून-मिसळून राहण्याचा स्वभाव बिग बॉसमध्ये गेम खेळताना पथ्यावर पडला आहे.
माधवची आई कांचन देवचके म्हणते, “, बिगबॉस हा गेम तुमच्यातला संयम जोखण्याची स्पर्धा आहे. त्यामूळे माधवमधला संयम बिग बॉस खेळताना वृध्दिंगत होतोय, ह्याचा मला आनंद आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घरच्यांवरून एकमेकांना शिव्या घालणारे स्पर्धकही प्रेक्षकांनी पाहिले. पण कोणत्याही स्पर्धकाला आई-बहिणीवरून शिवी न घालता, कोणाचेही मन न दुखवता माधव खेळतोय. ह्याबद्दल माधवच्या चाहत्यांना नक्कीच त्याचा अभिमान वाटत असणार, म्हणूनच तर त्याचं सोशल मीडियावरून एवढं भरभरून कौतुक होतंय.”
घराची साफ सफाई करताना माधवच्या डोळ्यांत मध्यंतरी अश्रु तरळले होते. त्याविषयीही प्रतिक्रिया देताना कांचन देवचके म्हणाल्या, “आपल्या करीयरच्या धावपळीत माधवला कधी घरकाम करायची संधी मिळाली नाही. आज जसा तो बिग बॉसच्या घरात सलग सात आठवडे राहिलाय. तसा घरी कधीच राहिला नाही आहे. आम्हांला त्याच्या अभिनय कारकिर्दीचा आणि बिग बॉसच्या घरातल्या प्रवासाचा नेहमीच अभिमान राहिल.”