नातं कोणतंही असो, ते तुटताना त्रास होतोच… गेल्या काही दिवसांत बिग बॉसच्या घरात रंगलेल्या वादावरून पुष्कर, सई आणि मेघा याच त्रासाला सामोरे जाताना आपण पाहत होतो… या मैत्रीला पूर्णविराम लागतो की काय अशी शंका येत असतानाच… ही मैत्री टिकवून ठेवण्यासाठी पुष्कर जोगने पुढाकार घेऊन स्वत:ला आणि आपल्या मैत्रीणींना तुटणाऱ्या या नात्याच्या पेचात अडकण्यापासून वाचवलं आहे.
भावनांना महत्त्व देणाऱ्या पुष्करने पुन्हा एकदा पुढे केलेला हा मैत्रीचा हात, “संवादाने कोणताही पेच सुटतो, व्यक्त होणं महत्त्वाचं असतं” हा संदेश प्रेक्षकांना नव्याने करून देत आहे. एका ठिणगीमुळे पेटलेलं बिग बॉसचं घर आणि त्यात पुष्कर, सई, मेघा यांच्या मैत्रीत आलेला दुरावा संपुष्टात आणण्यासाठी पुष्करने संवादाचं शस्त्र वापरून या मैत्रीत निर्माण झालेल्या गैरसमजांच्या शत्रूचा पराभव केला आहे.
“झालं, गेलं, सगळं मी विसरून गेलो असून माझ्याकडून काही बोललं गेलं असल्यास मला माफ करा आणि मला सोडून जाऊ नका असं म्हणत” पुष्करने कालच्या भागात सई, मेघाला मैत्रीची हाक दिली आहे.
वादांसाठी प्रसिध्द असणाऱ्या बिग बॉसच्या घरात नात्यांनाही तितकंच महत्त्व आहे, हे यावरून स्पष्ट होतं. पहिल्या दिवसापासूनच नाती जपणाऱ्या पुष्करने आपल्या प्रामाणिकपणाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सच्चा दिलाचा हा खेळाडू आता बिग बॉस फायनल्समध्ये ही आपली जागा निश्चित करण्यात यशस्वी झाला आहे.