बिनछताच्या बसमध्ये पार पडला एक अतरंगी दिवस
लहानपण हे एका फुलासारखे असते… आणि त्याची आठवण म्हणजे त्या फुलांचा सुगंध ! अश्या या रंगबेरंगी फुलांसोबत ‘देवा’ फेम अभिनेता अंकुश चौधरीने नुकताच ‘चिल्ड्रन्स डे’ साजरा केला. १४ नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतात साजरा करण्यात येत असलेल्या ‘बालदिना’ चे औचित्य साधत, निलांबरी या बिनछताच्या बसमध्ये काही गरजू आणि अनाथ मुलांबरोबर बालदिनाचा आनंद लुटला.
इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स निर्मित ‘देवा’ ह्या आगामी मराठी सिनेमाच्या निमित्ताने, आपल्या लाडक्या अंकुशसोबत काहीवेळ घालवण्याची नामी संधी बच्चेकंपनीने पुरेपूर लुटली. खास करून, निलांबरी बसमधून मरीन ड्राईव्हची अविस्मरणीय सफर त्यांना घडली. लोकांना मदत करणा-या ‘देवा’ची भूमिका अंकुश त्याच्या आगामी सिनेमात साकारात असून, ख-या आयुष्यातदेखील तो अगदी ‘देवा’ या पात्रासारखाच आहे. अंकुशने स्वतः त्याच्यापरीने अनेकांना मदत केली असून, सामाजिक कार्यातदेखील तो नेहमीच पुढे असतो. त्याच्या याच स्वभावामुळे अतरंगी ‘देवा’ ने साजरा केलेला ‘बालदिन’ त्याच्यासाठीदेखील एक खास दिवस ठरला. अंकुशने या सर्व मुलांसोबत गप्पा-गोष्टी करत, त्यांना खाऊ आणि भेटवस्तूदेखील दिल्या. गरजू लहान मुलांवर प्रेमाची पांखरण करणारा हा ‘देवा’ अंकुश ख-या अर्थाने जगला.
मुरली नलप्पा दिग्दर्शित हा सिनेमा येत्या १ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असून, तेजस्विनी पंडित हिची देखील प्रमुख भूमिका यात आहे. ‘देवा’ चा हा अतरंगी सिनेमा किती धम्माल आणतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.