दिवाळीच्यावेळी बाजारपेठांमध्ये सामान्यांना चालणं अशक्य होऊन जातं. त्यात सेलिब्रिटींची काय गत होत असेल. सेलिब्रिटींना तर एरवीसुध्दा रस्त्यावर चालणं मुश्कील होऊन जातं. जिथे जातील तिथे चाहत्यांचा गराडा पडतो.
त्यामूळेच यंदा मुंबईत दिवाळी शॉपिंग करण्यासाठी सिध्दार्थ जाधवने एक नामी युक्ती लढवली. सिध्दार्थने चक्क तोंडाला आपला स्कार्फ बांधला. आणि ह्या मास्कमूळे तो आपल्या कुटूंबासोबत मुंबईच्या रस्त्यावर उतरून शॉपिंग करू शकला.
सिध्दार्थच्या जवळच्या सूत्रांच्या अनुसार, अभिनेता सिध्दार्थ जाधव हा प्रसिध्दीच्या शिखरावर असूनही त्याला सामान्य माणसासारखे आयुष्य जगायला आवडते. दिवाळी ही तो सामान्यासारखीच साजरी करतो. पणत्या असो, कंदील असो, की त्याच्या मुलींच्या कपड्यांची शॉपिंग. तो स्वत: जाऊन खरेदी करतो. पण आता तो खूप मोठा स्टार झाल्याने अर्थातच रस्त्यावर पाच मिनीटे चालणेही त्याला मुश्कील झाले आहे. त्यामूळे त्याने तोंडाला मास्क लावून शॉपिंग केली
ह्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, सिध्दार्थ सध्या रोहित शेट्टीची बहुचर्चित फिल्म ‘सिंबा’ मध्ये महत्वाच्या भूमिकेत आहे. त्यामूळे तो हैदराबाद रामोजी रावमध्ये चित्रीकरणात व्यस्त आहे. पण दिवाळीच्या अगोदर कशीबशी त्याला दोन दिवसांची सुट्टी मिळाली. आणि सिध्दार्थने तडक मुंबई गाठून आपल्या चिमुकलींसाठी दिवाळी शॉपिंग केली.
अभिनेता सिध्दार्थ जाधवला यासंदर्भात विचारले असता तो म्हणाला,” दिवाळी अगोदरचा रविवार म्हणजे मुंबईच्या बाजारपेठांमध्ये तोबा गर्दी असते. मग खरेदी कशी करणार हा प्रश्न होता. त्यात कार घेऊन रस्त्यावर जाणे, म्हणजे ट्रॅफिकमध्ये अडकणार हे नक्की. म्हणून मग सरळ बाईक काढली, आणि बायको आणि मुलींसह स्कार्फ लावून दिवाळीची पटकन खरेदी आटोपली.”