थरारक वातावरणात लॉच झाले ‘लपाछपी’चे ट्रेलर

अंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये झळकलेला ‘लपाछपी’ हा सिनेमा १४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. मिडास टच मुव्हीजचे जितेंद्र पाटील व वीना पाटील आणि वाईल्ड एलीफंट मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अरुणा भट व सुर्यवीरसिंग भुल्लर निर्मित या सिनेमाने आंतर राष्ट्रीय स्तरावर भारतीय हॉरर सिनेमांचा नवा आयाम रुजवला आहे. दिग्दर्शक विशाल फुरिया कृत ‘लपाछपी’चा हा बोलबाला आता महाराष्ट्रात देखील होताना दिसत आहे. महालक्ष्मी येथील फेमस स्टुडियोमध्ये या सिनेमाच्या ट्रेलरचे नुकतेच अनावरण करण्यात आले.
आजूबाजूला उसाचे शेत, काळोख, आणि ट्रांजिस्टवर घुमणारे ‘लपाछपी’चे गाणे अशी वातावरण निर्मिती करत, या सिनेमाचा ट्रेलर लॉच करण्यात आला. सिनेमाचा ट्रेलर पाहताना ‘लपाछपी’ सिनेमातील हॉररची कल्पना येते. अभिनेत्री पूजा सावंत या ट्रेलरमध्ये एका नव्या रूपातच लोकांसमोर येत असल्यामुळे, तिच्या चाहत्यांना देखील तो आच्छर्याचा धक्का ठरत आहे. यात ती ८ महिन्याची गरोदर महिला असून, आपल्या बाळाला वाचवण्यासाठी तिची धडपड या ट्रेलरमध्ये दिसून येते. विशेष म्हणजे हा ट्रेलर अधिक हॉरर करण्यासाठी एक्स्ट्रा साऊंड इफेक्टचा वापर करण्यात आल्यामुळे, ट्रेलर पाहणाऱ्यांचा थरकाप उठल्याशिवाय राहत नाही.
एव्हढेच नव्हे तर, रेखा भारद्वाज यांनी गायलेले ‘लपाछपी’ सिनेमातील बालगीत देखील रसिकांच्या अंगावर काटा उभा करून जातो. ‘एकच खेळ लपाछपीचा…’ असे बोल असणारे हे गाणे या सिनेमाच्या ‘भीती’ ला योग्य न्याय देतं. सिनेमातील या गाण्याच्या नंदिनी बोरकर मूळ गायिका असून, स्वयेश्री शसीन वर्धावे यांनी हे बालगीत लिहिले आहे. शिवाय रंजन पटनाईक, टॉनी बसुमातरी आणि उत्कर्ष धोटेकर या तिघांनी गाण्याचे संगीतदिग्दर्शन केले आहे.
या सिनेमाची कथा दिग्दर्शक विशाल फुरिया आणि विशाल कपूर यांनी लिहिली आहे. ‘लपाछपी’ हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट भयपट ठरण्याची शक्यता असल्याचा अंदाज, सिनेमाचा ट्रेलर पाहताना होतो.
पूजा सावंतची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमात उषा नाईक, अनिल गावस आणि विक्रम गायकवाड या कलाकरांचीदेखील भूमिका असून, आतापर्यंत खुमासदार मनोरंजांच्या दुनियेत मश्गुल होत असलेल्या सिने चाहत्यांसाठी हा सिनेमा मनोरंजनाचा थरकाप उडवणारा ठरणार आहे.

Exit mobile version